ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:36 IST2026-01-03T19:35:29+5:302026-01-03T19:36:06+5:30
पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे.

ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे हवेतून डागले जाणारं क्रूझ मिसाईल असून याची मारक क्षमता ६०० किलोमीटरपर्यंत आहे. हे मिसाईल संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचं असून याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या मिसाईलची यशस्वी चाचणी पाकिस्तानच्या एरोस्पेस आणि संरक्षण कार्यक्रमातील मोठं यश आहे.
भारताने गेल्या वर्षी मे महिन्यात पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' केलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पाहायला मिळाला. या संघर्षादरम्यान ड्रोन, मिसाईल आणि हवाई शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या साह्याने पाकिस्तानवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानही आपली हवाई शक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे.
Pakistan 🇵🇰 Air Force has successfully conducted the flight test of the indigenously developed TAIMOOR Air Launched Cruise Missile, marking a major milestone in the advancement of Pakistan’s aerospace and defence capabilities.
— Defence Insider (@defence_insider) January 3, 2026
With a range of 600 kilometers, TAIMOOR is capable… pic.twitter.com/KeLx23LfdE
'तैमूर'ची ताकद
पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 'तैमूर'चं यशस्वी प्रक्षेपण हे राष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे मिसाईल ६०० किलोमीटरच्या टप्प्यात शत्रूची जमीन आणि समुद्रातील ठिकाणं अत्यंत अचूकतेने नष्ट करण्यास सक्षम आहे. यामध्ये पारंपारिक वॉरहेड बसवता येत असल्याने ते अधिक शक्तिशाली ठरतं.
पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे मिसाईल अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि गायडन्स सिस्टमने सुसज्ज आहे. हे मिसाईल अतिशय कमी उंचीवरून उडण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. कमी उंचीवरून उडण्याच्या क्षमतेमुळे ते शत्रूची रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण यंत्रणा सहजपणे चुकवू शकते.
पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख जहीर अहमद बाबर सिद्धू यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे. तसेच 'तैमूर'च्या अचूक मारक क्षमतेमुळे हवाई दलाची शक्ती आणि ऑपरेशनल लवचिकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असं म्हटलं आहे.