Shashi Tharoor Poem Sanju Samson Century MI vs CSK IPL 2026: मधील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संजू सॅमसननेमुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक खेळी केली. संजूने अवघ्या ५४ चेंडूत १०१ धावा फटकावून मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याच्या या नेत्रदीपक खेळीमुळे प्रभावित होऊन ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी संजूवर एक विशेष कविता लिहून पोस्ट केली. इंग्रजी शब्दांचे आणि भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या थरूर यांनी इंग्रजीतून कविता लिहिले, त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
संजूचे वानखेडेवर दमदार शतक
गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याने मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकणारा तो चेन्नईचा पहिला फलंदाज ठरला. संजूच्या या १०१ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने मुंबईचा १०३ धावांनी मोठा पराभव केला. संजूच्या खेळीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शशी थरूर यांनी त्याच्या खेळीला खास काव्यात्मक दाद दिली.
शशी थरूर यांची 'काव्यात्मक' दाद
नेहमीच आपल्या शब्दसंपदेने सर्वांना थक्क करणारे शशी थरूर संजूच्या खेळाने इतके भारावले की त्यांनी या शतकाचे कवितेच्या रुपात कौतुक केले.
शशी थरूर यांच्या कवितेचे मराठीत भाषांतर-
संजूमध्ये काहीतरी खास आहे, जणू एक नाजूक हवा,
मनगटाची एक हलकीशी हालचाल आणि चेहऱ्यावरचा निश्चिंत भाव.
जेव्हा टायमिंग अचूक असतं आणि बॅट चेंडूला लागते,
तेव्हा तो ते साध्य करतो, ज्याचं प्रत्येक हृदय फक्त स्वप्नच पाहू शकतं.
जयपूरच्या झगमगाटापासून ते वानखेडेच्या उन्हापर्यंत,
तो आधी दडपण निर्माण करतो, मग निर्भयपणे धावा काढतो.
शतक, जणू एक उत्कृष्ट कलाकृती,
चेपॉक असो वा डर्बन, प्रत्येक मैदानावर ते शानदार दिसतं.
कोणतीही ताकद नाही, संघर्षाचा कोणताही आवाज नाही,
फक्त एक सहज उड्डाण, जणू प्रकाशाच्या मधोमध मारलेला एक फटका.
झळकावलेलं शतक म्हणजे कॅनव्हासवर कोरलेलं एक चित्र,
प्रत्येक फटक्यात कला, प्रत्येक शॉटमध्ये एक नवीन प्रभाव.
प्रतीक्षा मोठी असू शकते, पण जेव्हा तो क्षण अखेर येतो,
तेव्हा संजूसारखी जादू दुसरीकडे कुठेच दिसत नाही.
![]()
टीकाकारांना चोख उत्तर
संजू सॅमसनच्या सातत्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, वानखेडेवरील या खेळीने त्याने सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. संजूने दाखवून दिले की, त्याच्याकडे केवळ टॅलेंट नाही तर मोठी खेळी करण्याची जिद्दही आहे.