बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:52 IST2026-04-24T13:50:29+5:302026-04-24T13:52:14+5:30
West Bengal Assembly Election 2026: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात भाजपाचा प्रचंड बहुमत मिळेल, अंग, बंग, कलिंग तिन्ही क्षेत्रात भाजपाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी किती जागांवर भाजपाचा विजय होईल, याचा आकडाही अमित शाह यांनी सांगितला आहे.

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी काल मतदान झाले. पहिल्या टप्प्यात तब्बल ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने राज्यात सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करून तयार असलेल्या भाजपाच्या नेत्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात भाजपाचा प्रचंड बहुमत मिळेल, अंग, बंग, कलिंग तिन्ही क्षेत्रात भाजपाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याबरोबरच मतदानाची वाढलेली टक्केवारी लोकांचा लोकशाहीवर वाढलेला विश्वास दर्शवतत आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी किती जागांवर भाजपाचा विजय होईल, याचा आकडाही अमित शाह यांनी सांगितला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त करताना अमित शाह म्हणाले की, माझ्याकडे येत असलेल्या माहितीनुसार राज्यातील जनतेने पहिल्या टप्प्यामध्येच आपलं भवितव्य निश्चित केलं आहे. राज्यात प्रचंड बहुमतासह भागपाचं सरकार स्थापन होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी ११० जागांवर भाजपाला विजय मिळणार आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बंगालमधील मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करून बदलाच्या बाजूने मत दिलं आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास मजबूत झाला आहे. आता बंगालमधील दहशतीचं राज्य संपुष्टात येईल. तसेच महिलांच्या सुरक्षेला आमच्या सरकारकडून प्राधान्य दिलं जाईल, असेही अमित शाह यांनी सांगितले.