Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांचा दणका, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 22:42 IST2026-01-03T22:40:10+5:302026-01-03T22:42:17+5:30
वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांचा दणका, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडत विजयाचा विश्वास व्यक्त केला. या सभेत फडणवीस यांनी तारखांचा संदर्भ देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. १६ तारीख ही स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे आणि त्याच दिवशी मुंबईच्या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवून महापौर बसवायचा आहे, असे म्हणाले.
ज्युनिअर ठाकरेंचा 'अबोध बालकं' म्हणून उल्लेख!
मुंबईतील विकासकामांचे श्रेय घेणाऱ्यांवरही फडणवीस यांनी निशाणा साधला. "मुंबईत सध्या श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही 'अबोध बालके' विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ये पब्लिक है, सब जानती है. आमच्या कामाची जितीजागती स्मारकं आज मुंबईत उभी आहेत, आम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही," असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
'बुरखेवाली मेयर'वरून ठाकरेंवर निशाणा
वारिस पठाण यांच्या एका विधानाचा संदर्भ देत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "परवा वॉरिस पठाण म्हणाले की, मुंबईत 'बुरखेवाली मेयर' बनेल. आम्हाला वाटले होते की, स्वतःला मराठी अस्मितेचे रक्षक म्हणवणारे आता तुटून पडतील, पण अचानक त्यांच्या भोग्यांचे सेल डाऊन झाले. एकही जण बोलायला तयार नाही. पण मी छातीठोकपणे सांगतो, या मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि हिंदूच असेल!"
मुंबईकरांना हक्काच्या घराचे आश्वासन
मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही. त्याला इथेच घर देऊ आणि तेही मोठे घर देऊ. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराचे घराचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. आम्हाला केवळ राजकारण करायचे नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे."