Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:26 IST2026-01-03T18:23:48+5:302026-01-03T18:26:28+5:30
Clicks Communicator Launched: नव्या वर्षाच्या सुरुवातीला धमाकेदार स्मार्टफोनची बाजारात एन्ट्री झाली आहे.

Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
एकेकाळी स्मार्टफोन मार्केटमध्ये ब्लॅकबेरी नावाचा दबदबा होता. बिझनेस-क्लास लूक आणि कीबोर्डमुळे हा फोन प्रत्येकाच्या पसंतीस उतरायचा. मात्र, आयफोन आणि अँड्रॉइडच्या लाटेत ब्लॅकबेरी मागे पडली. आता तोच जुना रॉयल अनुभव पुन्हा देण्यासाठी बाजारात एका नव्या स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. हा फोन थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनला टक्कर देत आहे.
क्लिक्स कम्युनिकेटर असे या फोनचे नाव आहे. क्लिक्स कंपनी आतापर्यंत आयफोनसाठी कीबोर्ड केसेस बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. मात्र, आता त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा फिजिकल कीबोर्ड, जो तुम्हाला २००० च्या दशकातील ब्लॅकबेरीची आठवण करून देतो. पण हा केवळ जुना फोन नसून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा ट्विस्ट देण्यात आला आहे.
या फोनमध्ये ४.०३ इंच AMOLED डिस्प्ले मिळतो. हा फोन लेटेस्ट Android 16 वर चालतो आणि यात शक्तिशाली MediaTek 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. क्लिक्स कम्युनिकेटरमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २४ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ४००० mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, जी दीर्घकाळ चालेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फोनमध्ये आयफोन १५ आणि १६ सिरीजप्रमाणे एक प्रोग्रामेबल साईड बटण दिले आहे. याशिवाय एअरप्लेन मोडसाठी एक स्वतंत्र समर्पित बटण देण्यात आले आहे, जे याला इतर अँड्रॉइड फोनपेक्षा वेगळे ठरवते.
बूक करा अन् ९ हजार वाचवा!
क्लिक्स कम्युनिकेटरची अधिकृत किंमत $४९९ (सुमारे ४५,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही हा फोन आता बूककेला, तर तो तुम्हाला $३९९ (सुमारे ३६,००० रुपये) मध्ये मिळू शकतो. बुकींसाठी ग्राहकांना $१९९ भरावे लागतील.