Cannes Film Festival 2026 : कान्सच्या रेड कार्पेटवर नऊवारी साडी-नथीचा नखरा आणि कोल्हापुरी साज-मराठी स्टाइलची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 14:04 IST2026-05-18T13:09:09+5:302026-05-18T14:04:28+5:30
Cannes 2026 Red Carpet: Ashok Saraf Cannes Appearance: Nivedita Saraf Traditional Look: नऊवारी, पैठणी आणि कोल्हापुरी साजात झळकले मराठी कलाकार, प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक लूकची चर्चा

फ्रान्समध्ये दरवर्षी भरणारा कान्स चित्रपट महोत्सव हा जगभरातील फॅशन आणि सिनेमाचे सर्वात मोठे व्यासपीठ मानला जातो. या आंतरराष्ट्रीय मंचावर आजवर बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांचाच बोलबाला पाहायला मिळाला आहे. परंतु, कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल मराठी संस्कृतीचा आणि कलेचा डंका देखील पाहायला मिळाला आहे. (Cannes 2026 Marathi Celebrities)

यंदा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र रेड कार्पेटवर हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, ग्लॅमरस क्वीन प्राजक्ता माळी, लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू वालावलकर (कोकण हर्टेड गर्ल) आणि प्रसिद्ध पत्रकार जयंती वाघधरे हे रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. त्यांनी या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत, नथ,नऊवारी साडी आणि चंद्रकोर लावली. त्याच्या फॅशन आणि ज्वेलरीबद्दल पाहूया.(Marathi Stars at Cannes 2026)

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटसाठी पैठणी कापडातील मोरपंखी रंगाची आणि गडद निळ्या काठपदराची आकर्षक नऊवारी साडी परिधान केली होती. तिच्या या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तिने नाकात अस्सल मराठी नथ, गळ्यात कोल्हापुरी ठसक्याची ठुशी, दंडावर बाजूबंद, कंबरपट्टा आणि छल्ला ऐवजी तणमणी हार तिने कंबरेला बांधला आहे. हातात तोडे-बांगड्या घातल्या होत्या. केसांचा अंबाडा बांधून त्यावर मोत्यांची चैनही घातली होती. पायात पैंजण आणि मोत्यांच्या डिझाइनच्या हिल्समुळे तिचा संपूर्ण लूक अधिक खुलून दिसत होता.(Prajakta Mali Cannes 2026 Look)

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पेस्टल हिरव्या आणि राखाडी रंगाची सुंदर जरीकाम केलेली पैठणी साडी नेसली होती.त्यावर गुलाबी-जांभळ्या रंगाचा शेला त्यांच्या लूकला अधिक उठावदार बनवत होता. गळ्यात मोत्यांचा पारंपरिक हार आणि काळ्या मण्यांचे लांब डायमंड मंगळसूत्र, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा त्यांचा साज होता. विशेष म्हणजे त्यांनी हातात ‘पैठणी आर्ट’ची डिझायनर क्लच पर्स घेतली होती. केसांत मोगऱ्याचा गजरा माळल्यामुळे त्यांचा पारंपरिक लूक अधिकच देखणा दिसत होता. (Cannes Film Festival 2026 Marathi Fashion)

लोकप्रिय डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू वालावलकर हिने कान्समध्ये इंडो-वेस्टर्न लूक साकारत वेगळी फॅशन स्टेटमेंट केली. तिने पेस्टल गुलाबी रंगाची धोती स्टाईल साडी परिधान केली होती. या साडीवर आकर्षक फुलांची डिझाईन होती. त्यासोबत ऑलिव्ह ग्रीन रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज तिने परिधान केला होता. गळ्यात मोत्यांचा मल्टीलेअर कॉलर नेकलेस, हातात मॅचिंग ब्रेसलेट आणि पायात चांदीचे पैंजण असा तिचा साधा पण स्टायलिश लूक पाहायला मिळाला.

प्रसिद्ध अँकर आणि पत्रकार जयंती वाघधरेने नेहमीच्या साडीपेक्षा हटके अंदाज निवडत रेड कार्पेटवर वेगळी छाप पाडली. त्यांनी पैठणी साडीपासून तयार केलेला घेरदार गाऊन परिधान केला होता. त्यावर मोराच्या नक्षीचे आकर्षक कॉरसेट ब्लाउज होते. तांबड्या आणि केशरी रंगछटांच्या या पोशाखाने अनेकांचे लक्ष वेधले. गळ्यात हिरवा आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन असलेला चोकर हार, कानात मॅचिंग दागिने, डोक्यावर मांगटिका आणि केसांची लांब वेणी असा त्यांचा साज होता. वेणीत ‘चंद्रकोर’ आणि पारंपरिक दागिने गुंफण्यात आले होते. हातात हिरव्या काचेच्या बांगड्या आणि नाकातील मराठी नथ त्यांच्या लूकला परफेक्ट फिनिशिंग देत होती.

















