संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...

By हरी मोकाशे | Updated: May 18, 2026 21:15 IST2026-05-18T21:13:30+5:302026-05-18T21:15:04+5:30

लातूरच्या तळीखेड पाटीजवळील घटना

Outrageous! 5 people seriously injured in car-gig accident; No ambulance found even after half an hour... | संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...

संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...

निलंगा (जि. लातूर): लातूर-जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ कार आणि टमटम समोरासमोर आदळून भीषण अपघात झाल्याने ५ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर निलंगा उपजिल्हा रुग्णालयास माहिती देऊनही तेथील रुग्णवाहिका डिझेलअभावी घटनास्थळी पोहोचली नाही. प्रशासकीय यंत्रणेच्या या कारभारामुळे गंभीर जखमी तब्बल अर्धा तास रस्त्यावरच तडफडत पडून होते. अखेर स्थानिकांनी माणुसकी दाखवित खासगी वाहनांतून रुग्णालयात दाखल केले. ही घटना रविवारी रात्री १०च्या सुमारास घडली.

औराद शहाजानीकडून निलंग्याकडे १७ मे रोजी रात्री टमटम (एमएच १४, जेपी ६७२३) येत होता. तेव्हा निलंग्याहून औरादकडे कार (एमएच १२, पीएन ३९२३) जात होती. लातूर- जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात कार आणि समोरून येणाऱ्या टमटमचा जोरात अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातात टमटममधील लक्ष्मीबाई प्रकाशराव मसलगे, प्रकाश नरसिंराव मसलगे हे गंभीर जखमी झाले. इंदू प्रकाश मसलगे व सिंधू प्रकाश मसलगे या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या. तसेच कारमधील मीनाक्षी पुरुषोत्तम मंत्री, त्यांचे पती पुरुषोत्तम दगडू मंत्री, वैष्णवी जुगलकिशोर मंत्री व वसुधा जुगलकिशोर मंत्री हे गंभीर जखमी झाले.

रुग्ण वेदनेने विव्हळत राहिले...

अपघात होताच घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करून माहिती दिली. दरम्यान, निलंगा उपजिल्हा रुग्णालयास माहिती देण्यात आली. परंतु, डिझेल नसल्याने वाहन येऊ शकत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सरकारी रुग्णवाहिका न आल्याने जखमी रुग्ण रस्त्यावर वेदनेने विव्हळत होते. अखेर स्थानिक नागरिक व प्रवाशांनी खासगी वाहनांची व्यवस्था करुन तातडीने उपजिल्हा व खासगी रुग्णालयात दाखल केले. मीनाक्षी मंत्री आणि लक्ष्मीबाई मसलगे ह्या गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले.

रुग्णांच्या जीवाशी खेळ?

कोट्यवधीचा निधी मिळणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत डिझेल नसणे, हे वैद्यकीय प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाणे आहे. रात्री २ वाजता रुग्णवाहिकेत डिझेल भरल्यानंतर गंभीर जखमींना लातूरला हलविण्यात आले. डिझेलअभावी एखाद्याचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title : कार-टेंपो दुर्घटना: पांच गंभीर रूप से घायल, एम्बुलेंस में देरी!

Web Summary : निलंगा के पास कार और टेम्पो की टक्कर में पांच लोग गंभीर रूप से घायल हो गए। अस्पताल को सूचित करने के बावजूद, डीजल की कमी के कारण एम्बुलेंस नहीं पहुंची। स्थानीय लोगों ने निजी वाहनों से घायलों को अस्पताल पहुंचाया।

Web Title : Horrific Car-Tempo Accident: Five Critically Injured, Ambulance Delayed!

Web Summary : Five were critically injured near Nilanga after a car collided with a tempo. Despite informing the hospital, an ambulance didn't arrive due to lack of diesel. Locals transported the injured to hospitals in private vehicles.