शरद पवारांची 'तेजस्वी' भेट, देशाच्या धुरंदर नेत्यासोबत 'पॉलिटीक्स पे चर्चा'

By महेश गलांडे | Published: February 10, 2021 11:10 AM2021-02-10T11:10:33+5:302021-02-10T11:37:03+5:30

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रय जनता दल आगामी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणुकांमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजदचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी दिल्ली दौरा केला.

दिल्ली दौऱ्यात तेजस्वी यादव यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पक्षाचे खासदार मनोज झा, सरचिटणीस अब्दुल सिद्दिकी आणि श्याम रजक यांच्याशीही चर्चा केली. झा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली.

बिहारलगतच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्यासाठी राजद इच्छुक आहे. त्यामुळेच, या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने चर्चा झाली. अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.

तेजस्वी यादव यांनी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांहीही भेट घेतली. यावेळी, सुप्रिया सुळेही भेटीसाठी उपस्थित होत्या.

शरद पवार हे अतिशय दयाळू आणि प्रेमळ नेते असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यादव यांनी भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, खासदार मनोज झा आणि पक्षाचे काही नेते उपस्थित होते. तेही या फोटोंमध्ये दिसून येत आहेत.

देशातील धुरंदर नेते शरद पवार यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत राजकारणासोबतच इतरही विषयांवर चर्चा केली. दयाळू आणि प्रेमळ नेते, नेहमीप्रमाणे आपल्या अनुभवाच्या खजिन्यातून अंतर्दृष्टी आणि ज्ञानाचे मोती त्यांनी दिले, असे तेजस्वी यांनी म्हटलंय.

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने निवडणूक लढवली होती. त्यावेळी, तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत. शरद पवार यांनी तेसस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं.

तेजस्वी यादव यांनी भाजपाप्रणित राजगच्या आघाडीला तगडं आव्हान दिलं होत. मात्र, महाआघाडीला बहुमत मिळवणे शक्य झालं नाही.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत दाखवलेल्या धडाडीच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेजस्वी यादव यांचे ट्विट रिट्विट केले आहे. या भेटीबद्दल तेजस्वी यादव यांनी सुप्रिया सुळेंचे आभार मानले.