अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 09:00 IST2026-04-26T08:59:31+5:302026-04-26T09:00:05+5:30
या मोहिमेसाठी अमेरिकेने आपली दोन आधुनिक 'लिमिटोरल कॉम्बॅट शिप्स' तैनात केली असून, जपानमधूनही विशेष 'माइनस्वीपर' जहाजे मध्यपूर्वेकडे रवाना झाली आहेत.

अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
वॉशिंग्टन / दुबई : जागतिक अर्थव्यवस्थेला असलेला धोका लक्षात घेऊन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने पेरलेले पाणसुरुंग हटविण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी नौदलाला सुरुंग शोधण्याची मोहीम तिप्पट वेगाने राबवण्याचे सांगतानाच, सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही बोटीवर थेट हल्ला करण्याचे आदेशही दिले आहेत.
पेंटागॉननुसार, हे सुरुंग पूर्णपणे साफ करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. फॉरेन पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक एम्मा सॅलिस्बरी यांच्या मते, इराणने केवळ सुरुंग पेरल्याची अफवा पसरवली तरी जहाजांचा या मार्गावरील विश्वास उडू शकतो. हे सुरुंग जुन्या सोव्हिएत बनावटीचे किंवा आधुनिक चिनी बनावटीचे असल्याची शक्यता आहे.
पाणसुरुंग शोधक जहाजे रवाना
या मोहिमेसाठी अमेरिकेने आपली दोन आधुनिक 'लिमिटोरल कॉम्बॅट शिप्स' तैनात केली असून, जपानमधूनही विशेष 'माइनस्वीपर' जहाजे मध्यपूर्वेकडे रवाना झाली आहेत. मोठ्या जहाजांऐवजी नौदलाचे विशेष पाणबुडे आणि स्फोटक तज्ज्ञ शत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून छोट्या गटांमध्ये काम करत आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरद्वारे लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याखालील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
विमा कंपन्या चिंताग्रस्त
होर्मुझचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास संमती देण्यास कचरत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत जहाजांना इराणच्या संमतीने त्यांच्या किनारपट्टीच्या जवळून प्रवास करावा लागत आहे. अमेरिकेच्या या ‘माइन हंटिंग’वरच आता तेलकिमतीचे भवितव्य अवलंबून आहे.