पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:34 IST2025-06-30T16:22:53+5:302025-06-30T16:34:43+5:30

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये राफेल फायटर जेटने दाखवलेल्या ताकदीमुळे त्याची मागणी जगभरात वाढली आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये राफेल फायटर जेटने दाखवलेल्या ताकदीमुळे त्याची मागणी जगभरात वाढली आहे. आता पोर्तुगाल देखील फ्रान्सकडून राफेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे. राफेल विमान बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ यांनी फ्रेंच सिनेटला सांगितले की, कंपनी पोर्तुगालसोबत राफेल मल्टीरोल फायटर जेटच्या कराराची तयारी करत आहे.

डसॉल्ट एव्हिएशनने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा जगभरातील फायटर जेट बाजारपेठेत स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोर्तुगाल सध्या आपल्या संरक्षण रणनीतीमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची योजना आखत आहे, कारण ते त्यांच्या जुन्या 'एफ १६' ताफ्याला बदलण्यासाठी पर्यायांवर विचार करत आहे.

बल्गेरियन मिलिट्रीनुसार, पोर्तुगाल १९९०च्या दशकापासून अमेरिकन फायटर जेट एफ-१६वर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. १९९४ मध्ये पोर्तुगालने अमेरिकेकडून २० एफ-१६ विमाने खरेदी केली होती. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी डेन्मार्ककडून वापरलेली २५ एफ-१६ विमाने खरेदी केली, ज्यामुळे पोर्तुगाल हवाई दल अमेरिकन फायटर जेट्सवर पूर्णपणे अवलंबून होते.

या काळात पोर्तुगाल अमेरिकेचे अपग्रेडेड एफ-३५ खरेदी करण्याच्या तयारीत होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील अनिश्चिततेच्या चिंतेमुळे पोर्तुगाल एफ-३५वर पुन्हा विचार करत आहे.

राफेल हे डबल इंजिन असलेले फायटर जेट आहे, ज्याची कॉम्बॅट रेडियस ३७०० किमी आहे. यात तीन प्रकारची क्षेपणास्त्रे बसवता येतात: हवेतून हवेत मारा करणारी मीटिओर (Meteor) क्षेपणास्त्र, हवेतून जमिनीवर मारा करणारी स्कॅल्प (SCALP) क्षेपणास्त्र आणि हॅमर (HAMMER) क्षेपणास्त्र.

राफेलची उंची गाठण्याची गती प्रति सेकंद ३०० मीटर आहे, म्हणजेच ते एका मिनिटात सुमारे १८ किलोमीटर उंचीवर जाऊ शकते. राफेल एकदा इंधन भरल्यावर सलग १० तास उड्डाण करू शकते. हे हवेतच इंधन भरण्यासही सक्षम आहे.

राफेलमध्ये बसवलेली गन एका मिनिटात २५०० फायर करू शकते. राफेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे रडार सिस्टिम. हे रडार १०० किलोमीटरच्या परिसरात एकाच वेळी ४० लक्ष्यांची ओळख पटवू शकते.