पाकिस्तान-सौदीत संरक्षण करार, आता भारताचाही मोठा डाव; २ मुस्लीम देशांमधील संघर्ष पथ्यावर पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:55 IST2026-01-20T13:48:24+5:302026-01-20T13:55:52+5:30

पाकिस्तानी माध्यमात सध्या २ बातम्या चर्चेत आहेत, त्यातील पहिली म्हणजे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियासोबत कराराचा विस्तार केला जाईल आणि दोन्ही देश मिळून त्यावर निर्णय घेतील असं विधान केले. दुसरी भारत आणि यूएई यांच्यातील संबंधांबाबत चर्चा आहे. भारत आणि UAE यांनी सोमवारी ३ अब्ज डॉलरच्या LNG करारावर स्वाक्षरी केली. ज्यात संरक्षण, व्यापारात सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दिली.

एकीकडे पाकिस्तानी सौदी अरेबियासोबत त्यांच्या संरक्षण संबंधांना वेगाने पुढे नेत आहे. दुसरीकडे भारत आणि यूएई यांचे संबंधही आणखी मजबूत होत आहेत. अलीकडेच यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहया यांनी २ दिवसांचा भारत दौरा केला. सोमवारी २ तास ते भारत दौऱ्यावर आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा केली.

भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने सोमवारी यूएईसोबत ३ अब्ज डॉलर्सचा एलएनजी खरेदी करार केला. या करारामुळे भारत यूएईचा सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. भारत-युएई चर्चेच पुढील ६ वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार २०० अब्ज डॉलरपर्यंत दुप्पट करणे आणि संरक्षण क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

भारत आणि युएई यांच्या करारानुसार अबु धाबीतील सरकारी कंपनी एडीएनओसी गॅस पुढील १० वर्षापर्यंत भारतातील हिंदुस्तान पेट्रोलियमला दरवर्षी ५ लाख मेट्रिक टन एलएनजीचा पुरवठा करेल. या नव्या करारामुळे भारतासोबत एकूण व्यापार मूल्य २० अब्ज डॉलरहून अधिक झाल्याचे एडीएनओसी गॅस कंपनीने म्हटलं आहे.भारत हा यूएईचा सर्वात मोठा ग्राहक असून हा LNG धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे असंही कंपनीने स्पष्ट केले.

युएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. युएईचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री देखील युएई सरकारच्या शिष्टमंडळाचा सहभागी होते. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीसाठी काम करण्यासाठी लेटर ऑफ इंटेटवर स्वाक्षरी केली आहे.

एकीकडे भारत-युएई तर दुसरीकडे पाकिस्तानचे सौदी अरेबियाशी संबंध वाढवत आहे. भारताचा मोठा शत्रू पाकिस्तानने गेल्या वर्षी सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया यांच्यातील त्रिपक्षीय संरक्षण कराराचा मसुदा तयार करण्याची घोषणा केली.

आता पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराबद्दल एक निवेदन जारी केले आहे. संरक्षण करारात कोणत्याही तृतीय पक्षाचा समावेश करण्याचा निर्णय दोन्ही देश संयुक्तपणे घेतील असे आसिफ यांनी म्हटलं. तुर्की किंवा इतर कोणताही देश या संरक्षण कराराचा भाग तेव्हाच बनतील जेव्हा पाकिस्तान आणि सौदी अरेबिया दोघेही सहमत असतील.

सौदी अरेबिया आणि युएई गेल्या काही वर्षांपासून जवळचे मित्र आहेत. परंतु अलीकडच्या काळात दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक स्पर्धा वाढली आहे. दोन्ही देशांनी प्रादेशिक धोरणांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन स्वीकारले आहेत. यमनमध्ये दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत आणि तेल उत्पादनावरूनही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यात युएईने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे देखील बंद केले आहे.

सौदी अरेबिया आणि युएईमधील वाढत्या शत्रुत्वातून निर्माण झालेल्या नवीन समीकरणाबाबत बोस्टनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ मॅक्स अब्राम्स यांनी एक्स वर लिहिले, पाकिस्तान-तुर्की-सौदी अरेबिया भागीदारीचा सामना करण्यासाठी भारत-इस्रायल-युएई त्यांचे संबंध मजबूत करत आहेत.

दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे की, युएईसोबत लेटर ऑफ इंटेटवर स्वाक्षरी केली त्याचा अर्थ असा नाही की ते भारत प्रादेशिक संघर्षात सामील होतील. एखाद्या प्रादेशिक देशासोबत संरक्षण आणि सुरक्षा आघाडीवर आमचे सहकार्य म्हणजे त्या प्रदेशातील संघर्षांमध्ये आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रकारे सहभागी होऊ असे नाही असं त्यांनी सांगितले आहे.