"हे अजितदादाच आहेत, किरण मोठ्याने रडायला लागले; चादर, बेडशीटमध्ये दादांना गुंडाळून...", सरपंचांनी सांगितली विमान पडल्यानंतरची सगळी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:31 IST2026-01-30T17:21:18+5:302026-01-30T17:31:42+5:30
"मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हे अजितदादांचं आहे, मग लोक स्तब्ध झालीत. या विमानात अजित पवार असतील, असं कोणालाच वाटलं नव्हतं." विमानाने घिरट्या घातल्यापासून ते मृतदेह रुग्णालयात नेण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम घडला त्यावेळी गोजुबावी गावचे सरपंच आटोळे यांनी तिथेच होते.

विमान पडल्यानंतर पहिल्यांदा गोजुबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे हे काही लोकांसह मोटारसायकलवरून सर्वात आधी तिथे पोहोचले होते. विमान अपघात आणि अजित पवारांच्या मृत्युबद्दल सांगताना ते म्हणाले, "सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी विमानाने गावाच्या कडेने दोन घिरट्या घातल्या. त्यावेळी विमानाचा आवाज अतिशय मोठा येत होता. नेहमीचा विमानाचा आवाज वेगळा असायचा. त्यावेळी आम्हाला जाणवलं आलं की विमानात बिघाड झाला असावा. त्यानंतर ८ वाजून ४४-४५ मिनिटांनी विमान पडले."

"विमान पडताना आम्ही डोळ्यांनी बघितले. त्यामुळे गावातील बरेच लोक मोटारसायकलवरून विमानतळाच्या बाजूला गेलो. त्यावेळी विमानातून धूर येत होता. आम्ही बघितलं, तर बरेच लोक म्हणाले, आता या विमानाचा स्फोट होऊ शकतो. आणि खरोखरंच एक-दीड मिनिटांनी मोठा स्फोट झाला", असे त्यांनी सांगितले.

सरपंच आटोळे यांनी सांगितलं की, "स्फोट झाल्यानंतर आम्ही जवळ गेलो, तर अजितदादा डाव्या बाजूला ४०-५० फुटांवर पडलेले होते. उजव्या बाजूला त्यांचे बॉडीगार्ड पडलेले होते. बाकी बाहेर कोणी नव्हते. आम्ही जातानाच पोलीस ठाण्यात कॉल केलेला होता. पोलीस त्याठिकाणी आले. त्यानंतर बारामतीचे किरण दादा गुजर हे देखील तिथे पोहोचले."

"किरण गुजर यांनी लगेच ओळखलं. आम्ही पण लगेच ओळखलं. पण, आम्ही जास्त घाबरलेलो होतो. ते मोठ्याने रडायला लागले की, हे अजितदादाच आहेत. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हे अजितदादांचं आहे, मग लोक स्तब्ध झालीत. या विमानात अजित पवार असतील, असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळे लोक घाबरले", असे आटोळेंनी सांगितले.

"धुकं नव्हतं. खरंतर विमानातच बिघाड झालेला असावा, कारण विमानाचा फार मोठा आवाज येत होता. घिरट्या मारून विमान धावपट्टीच्या दिशेने जात होतं, त्याचवेळी ते डाव्या बाजूला कललं आणि तसेच कलत जाऊन ते धावपट्टीवर न उतरता खाली पडलं. विमानाने दोन-तीन पलट्या मारल्या आणि खाली खड्ड्यात गेले", अशी माहितीही त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, "पोलीस आणि इतर यंत्रणा आल्या. तिथे रुग्णवाहिका यायला जागा नसल्यामुळे गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रस्ता बनवला आणि मग रुग्णवाहिका आली. शेजारी जे आटोळे म्हणून राहतात, त्यांच्या घरातून आम्ही चादर, बेडशीट घेऊन, दादांना त्यात गुंडाळून, स्ट्रेटरवर टाकून हॉस्पिटलमध्ये पाठवलं."

नगरपालिकेचा बंब आल्यानंतर आग विझवली. त्यानंतर गावकऱ्यांनी दोन-तीन ट्रॅक्टर आणले आणि ट्रॅकर्संनी विमान तोडून तीन मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून ते पाठवण्यात आले. रस्ता नसल्यामुळे त्याला वेळ लागला. एकदम माळरानात पडल्यामुळे रस्ता नव्हता. गावकऱ्यांनी रस्ता तयार केल्यावर रुग्णवाहिका तिथे आल्या", असेही आटोळेंनी म्हटले आहे.

"त्या दिवशीचा विमानाचा आवाजच वेगळा होता. त्यामुळे सगळे गावकरी बाहेर येऊन बघत होते की, आज विमानाला काय झाले आहे. खरंतर धावपट्टी उतरताना विमान हळू उतरते. पण, हे विमान अतिशय वेगात होते. जिथे धावपट्टी सुरू होते तिथेच ते विमान कललं आणि दरीत पडले", असे सांगत त्यांनी विमानात बिघाड झालेला असावा, यावरच भर दिला.

















