बोंबला! दारू न मिळाल्याने वैतागून त्याने विहिरीत मारली उडी, एका अटीवर आला बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 01:53 PM2020-04-08T13:53:56+5:302020-04-08T14:44:46+5:30

लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने, बार सगळीच बंद आहेत. त्यामुळे अनेक तळीराम दारू मिळवण्यासाठीही एकापेक्षा एक जुगाड करत आहेत.

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अशात कोरोना संकटात अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक तामिळनाडूतील अजब घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने, बार सगळीच बंद आहेत. त्यामुळे अनेक तळीराम दारू मिळवण्यासाठीही एकापेक्षा एक जुगाड करत आहेत. इथे एका व्यक्तीने दारू मिळत नसल्याने चक्क विहिरीत उडी घेतली. त्याला दारू देण्याचं आश्वासन दिल्यानंतर तो विहिरीतून बाहेर आला.

पट्टाभिरामचा निवासी 46 वर्षीय मनावलन याला दारू मिळत नसल्याने तो हैराम झाला होता. त्यामुळे वैतागून त्याने विहिरीत उडी घेतली आणि बराचवेळ तसाच पडून राहिला. नंतर त्याला रेस्क्यू टिमने वाचवले. (प्रातिनिधीक छायाचित्र)

मात्र, त्याला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना त्याच्यासोबत दोन तास चर्चा करावी लागली. कारण त्याने बाहेर येण्यासाठी अट ठेवली होती. तो म्हणाला होता की, दारू मिळेल तरच बाहेर येईल. अधिकाऱ्यांनी त्याची ही मागणी मान्य केली. (प्रातिनिधीक छायाचित्र)

मजूरी करणारा मनवलयन हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. त्याला मद्यसेवनाची सवय आहे. पण लॉकडाऊनमुळे त्याला दारू मिळत नसल्याने तो परेशान झाला होता. त्याचं पत्नीसोबत भांडणही झालं होतं. शेजाऱ्यांशी देखील भांडण झालं होतं. (प्रातिनिधीक छायाचित्र)

सोमवारी अशाच भांडणावेळी मानवलनने त्याच्या घरासमोरील 25 फूट खोल विहिरीत उडी घेतली. शेजाऱ्यांना हे माहीत होतं की, त्याला पोहता येतं. पण त्याने दारू दिल्याशिवाय बाहेर येण्यास नकार दिला. (Image Credit : positiveimpact.club) (प्रातिनिधीक छायाचित्र)

या घटनेची माहिती पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मानवलनसोबत बातचीत सुरू केली. नंतर रेस्क्यू टीमने दोरीच्या मदतीने मनावलनला बाहेर काढले.

दरम्यान केरळमध्येही दारूची विक्री बंद झाल्याने वेगवेगळ्या भागांमध्ये आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काही अटी घालून इथे दारूची होम डिलीव्हरी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दारू न देण्याचे आदेश दिले आहेत. याआधी दारू मिळत नसल्याने दोन लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सरकारने काही लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, अचानक दारू मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात.

कोरोना व्हायरसमुळे देशात 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. काही सेवा सोडल्या तर सगळं काही बंद आहे. तामिळनाडू सरकारने गेल्या आठवड्यात 14 एप्रिलपर्यंत दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Image Credit : Social Media)