Coronavirus: भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:21 PM2021-07-28T19:21:35+5:302021-07-28T19:32:51+5:30

Coronavirus: या देशाने प्रवास नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

रियाध: जागतिक स्तरावर अद्यापही कोरोनाचे थैमान वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.

दुसरीकडे अनेक देश कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नयेत, यासाठी अनेकविध उपाययोजना राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून सौदी अरेबियाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

सौदी अरेबियाने नागरिकांसाठी सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाने काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकले असून, यामध्ये भारताचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

काही सौदी नागरिकांनी मे महिन्यात प्रशासनाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करत प्रवासी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे सौदी अरेबियातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

तसेच कोणीही नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल, असे काही नियम सौदी अरेबियामध्ये लागू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथोपिया, भारत, इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये, असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे.

ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेले नाही किंवा ज्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत, तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर सौदी अरेबियातील नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

सौदी अरेबियात एकूण लोकसंख्या सुमारे ३ कोटी असून, मंगळवारी १ हजार ३७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, संपूर्ण देशातील कोरोना रुग्णसंख्या ५ लाख २० हजारांवर पोहोचली असून, ८१८९ जणांचे मृत्यू झाले आहेत.

मागील काही काळापासून सौदीतील संसर्गाचा दर कमी झाला आहे. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत.

भारतात गेल्या २४ तासांत ४३ हजार ६५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच याच कालावधीत ४१ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.