Omicron Symptoms In Kids: लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:10 PM2022-01-14T19:10:41+5:302022-01-14T19:17:16+5:30

Omicron Symptoms In Kids: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यातच लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमायक्रॉनची लक्षणं नेमकी कोणती आणि आता आणखी एका लक्षणाची त्यात भर पडली आहे.

कोरोनावर १५ वर्षांखालील मुलांसाठी लस येण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण देशात आता ओमायक्रॉन व्हेरिअंटनं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरिअंटच्या उद्रेकाचा सामना करत असातनाच आता ओमायक्रॉनच्या संकटानं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोगप्रतिकार शक्ती चांगली असूनही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं आता दिसून येत आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञांनी देखील लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या लहान मुलांमध्ये ओमायक्रॉनचं कोणतंही गंभीर स्वरुपाचं लक्षण दिसून येत नसलं तरी गाफील राहून चालणार नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे

लहान मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येत नसली तरी अमेरिकेत आता रुग्णालयांमध्ये लहान मुलं दाखल होण्याची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. लहान मुलांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं प्रौढ व्यक्तींपेक्षा वेगळी असू शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

द.आफ्रिकेचे डिस्कवरी हेल्थच्या एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार नाक बंद होणे, घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि पाठीचा खालचा भाग दुखणे ही सामान्य लक्षणं लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत.

अमेरिकेच्या लेविन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या डॉक्टर अमीना अहमद यांच्यानुसार, "लहान मुलांच्या तुलनेत प्रौढ व्यक्तींमध्ये घसा खवखवणे आणि कफ ही अधिक लक्षणं दिसत आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत असली तरी लोक आजारी पडत असल्याचं दिसून येत आहे"

"लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे यात काहीच नवी बाब नाही. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन अधिक वेगानं पसरत आहे. त्यामुळेच लहान मुलांनाही आता संसर्ग होऊ लागला आहे", असं अमेरिकेतील बालरोग तज्ज्ञ डॉ. सॅम डोमिंगुएज यांनी सांगितलं. ओमायक्रॉन विषाणू काही लहान मुलांमध्ये वेगळ्याच पद्धतीनं लक्षणं देऊ लागला असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉनची लागण झालेल्या काही लहान मुलांमध्ये डांग्या खोकला (Hooping cough) दिसून येऊ लागला आहे. याला बार्किंग कफ देखील म्हटलं जातं. कारण यात श्वास घेताना घुरघुरण्यासारखा आवाज येतो. डॉ. अमीना म्हणाल्या की, "लहान मुलांमध्ये दिसून येणारी लक्षणं ही काहीशी वेगळी आहेत. आपण डेल्टा आणि अल्फा व्हेरिअंटवेळी गंध न कळणं, चव जाणं ही लक्षणं पाहिली होती. पण ओमायक्रॉनमध्ये अशी लक्षणं दिसून येत नाहीत"

समोर आलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनमध्ये गंभीर आणि रुग्णलयात दाखल करावं लागेल अशी शक्यता फारच कमी आहे. काही लहान मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा त्रास देखील दिसून येऊ लागला आहे. याला MIS-C देखील म्हटलं जातं. यात शरीरातील वेगवेगळ्या जसं की हृदय, फुफ्फुसं, रक्तवाहिन्या, यकृत, कपाळ, त्वचा किंवा डोळ्यांत सूज येऊ शकते.

अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार देशात ५ वर्षांखालील मुलांचं कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. अमेरिकेत अद्याप पाच वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात झालेली नाही. अशीच परिस्थिती दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन रुग्णसंख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती तेव्हा पाहायला मिळाली होती.