पैज लावली तरी ओळखू शकणार नाही! फोटोतली 'ही' अभिनेत्री आज मराठीतली सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:31 IST2026-05-11T11:54:33+5:302026-05-11T12:31:46+5:30
अभिनेत्रीने आईसोबतचे फोटो शेअर करत लिहिले...

सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. काल मातृदिनानिमित्त एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचे आईसोबतचे फोटो पोस्ट केले.

या पोस्टमध्ये तिने अगदी छोट्या वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंतचे आणि शेवटी आताचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. तिचे बालपणीचे फोटो पाहून अभिनेत्रीला ओळखणंही कठीण आहे.

आईच्या कडेवर बसलेली ही चिमुकली कोण ओळखलंत का? फोटोमध्ये ती अतिशय क्युट दिसत आहे तर तिची आईही तरुणपणी किती छान दिसत होती अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

अभिनेत्रीचा हा फोटो पाहून अनेकांनी ओळखलं असेलच. ही आहे सर्वांची लाडकी मुक्ता बर्वे. मुक्ताने आईसाठी मातृदिनानिमित्त छान ओळी लिहिल्या आहेत.

ती लिहिते, "प्रिय आऊ, तुला ओळखणारे कोणीही भेटतात तेव्हा सांगतात की,'तुला बघितलं की अगदी बर्वे बाईंचा/ बर्वे काकुंचा/ बर्वे मावशीचा/ तुझ्या आईचाच भास होतो, वाटतं तुझी आईच आली समोर. काय गंमत वाटते माहितीये.

माझे लहानपणचे फोटो बघून वाटतं की किती वेगळी दिसत होते मी. गोल चेहरा, किलवर सारखं त्रिकोणी नाक ,कुरळे केस, उंची सगळंच वेगळं.

मी मोठी होत होते, छोट्या शाळेतून मोठ्या शाळेत, तिथून कॉलेज, मग करिअर. या सगळ्या प्रवासात, तू कधीच मला मी कशी दिसते, दिसायला पाहिजे या बद्दल काहीच सांगितलं नाहीस.

मात्र मी कशी असायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे याबद्दल मात्र तू कायम ठाम आणि आग्रही होतीस - आजही आहेस.

स्वतःच्या पायावर उभी रहा, जे काम करशील त्यावर मनापासून प्रेम कर, जीव ओतून मन एकाग्र करून कष्ट कर, तुझे १०१ % दे, स्वतःचे निर्णय स्वतः घे म्हणजे त्यांची जबाबदारी निभावता येते, भरभरून जग, जगण्यातला आनंद शोधत रहा…हे आणि असं बरंच काही जे तुझ्या जगण्यातून मला शिकवतेस तेच मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करते आहे.

हा प्रवास हळूहळू सुरु झालाय आणि मी आपोआप थोडी-थोडी तुझ्यासारखी दिसायला लागलेय बघ. आहे की नाही गंमत. तू जशी आहेस आणि आम्ही मुलांनी जसं व्हावं असं तुला वाटतं त्यासाठी तुला घट्ट मिठी. ता कः आऊ शुद्ध लेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष कर, तुझ्या विषयी लिहिते आहे ना म्हणून नेहमी प्रमाणे तुझ्याकडून तपासून घेता आलं नाही. तुझी.."

















