पैशाविना उद्योजक बनण्याचं स्वप्न सोडू नका! २० लाखांपर्यंत कर्ज मिळणे झाले सोपे; RBI चा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:34 IST2026-02-06T14:22:58+5:302026-02-06T14:34:02+5:30
RBI Collateral Free Loan Limit : भांडवल नसल्याने तुमच्या व्यवसायचे स्वप्न अपूर्ण असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले की, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी आता विनातारण कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांना आता बँकांकडून कर्ज घेताना कोणतीही मालमत्ता, दागिने किंवा कागदपत्रे गिरवी ठेवण्याची गरज भासणार नाही.

हा नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल. १ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर मंजूर होणाऱ्या सर्व नवीन कर्जांना आणि नूतनीकरण होणाऱ्या कर्जांना हा नियम लागू असेल.

हे धोरण प्रामुख्याने 'मायक्रो' (सूक्ष्म) आणि 'स्मॉल' (लघु) उपक्रमांसाठी आहे. ज्यांच्याकडे बँकेत तारण ठेवण्यासाठी मोठी मालमत्ता नाही, अशा नवउद्योजकांसाठी हे वरदान ठरेल.

अनेकदा केवळ तारण नसल्यामुळे बँका कर्ज नाकारतात. आता ही मर्यादा वाढल्यामुळे छोटे दुकानदार, फॅक्टरी मालक आणि सर्व्हिस सेक्टरमधील तरुण उद्योजक आपला व्यवसाय अधिक आत्मविश्वासाने वाढवू शकतील.

बँकांकडून कर्ज मिळणे सोपे झाल्यामुळे छोटे व्यावसायिक खाजगी सावकारांकडून जादा व्याजाने कर्ज घेण्याऐवजी अधिकृत बँकिंग प्रणालीकडे वळतील.

व्यवसायासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी करणे, कच्चा माल भरून ठेवणे किंवा व्यवसायाचा विस्तार करणे यासाठी २० लाखांचे भांडवल विनासायास उपलब्ध होईल.


'एमएसएमई' क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून ते कोट्यवधी लोकांना रोजगार देते. या क्षेत्राला बळ मिळाल्यास देशाच्या जीडीपीतही वाढ होईल.

शेवटच्या घटकापर्यंत अधिकृत बँकिंग सेवा आणि पतपुरवठा पोहोचवणे, हा या निर्णयामागचा रिझर्व्ह बँकेचा मुख्य उद्देश आहे.

आरबीआय लवकरच या संदर्भात बँकांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे, जेणेकरून बँका आणि कर्जदार यांच्यात कोणतीही शंका राहणार नाही.

















