डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:34 IST2026-05-19T09:34:14+5:302026-05-19T09:34:36+5:30
Donald Trump Threats Iran: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही देशात युद्धावर कोणताही तोडगा निघत नसताना ट्रम्प यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
पश्चिम आशियातील युद्धसंघर्ष तात्पुरता थांबणार असला, तरी तो पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणवर केले जाणारे हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली आहे. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी केलेल्या विनंतीनंतर ट्रम्प यांनी ही भूमिका घेतली आहे. पण, हे सांगत असतानाच ट्रम्प यांनी चर्चा यशस्वी झाली नाही, तर इराणवर आतापर्यंत झाला नाही, असा विध्वंसक हल्ला करून अशी धमकीही दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूमिका मांडताना म्हटले आहे की, "कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी, सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी मला आग्रह केला की, इराणसोबत गंभीरपणे चर्चा सुरू आहे. त्यामुळे लष्करी कारवाई टाळावी."
पूर्ण ताकदीनिशी इराणवर हल्ला करू, ट्रम्प यांची धमकी
अध्यक्ष ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणवर पूर्व नियोजित असलेले लष्करी हल्ले थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत आणि शांतता चर्चेला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय मी घेतला आहे. पण, जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर अमेरिका पूर्ण ताकदीनिशी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करेल", अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
युद्ध सुरू झाल्यापासून कतार, सौदी अरेबिया, यूएई हे देश इराणच्या हल्ल्यांना तोंड देत आहेत. पण, इराणकडून वारंवार सांगण्यात आले आहे की, हे हल्ले या देशांवर नसून, या देशातील अमेरिकेच्या ठिकाणांवर करण्यात आले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, संयुक्त चीफ चेअरमन जनरल डॅनियल कॅन आणि अमेरिकन लष्कराला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.