मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:33 IST2026-05-19T09:27:25+5:302026-05-19T09:33:17+5:30
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना

AI Generated Image
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि संपूर्ण समाजमनाला चक्रावून सोडणारी घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमतात, तिथे मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने रेल्वेगाडीसमोर उडी मारून आपले जीवन संपवल. लग्नाच्या पहिल्या रात्री पती-पत्नीत गंभीर वाद झाला होता, ज्यानंतर पत्नीच्या काही मित्रांनी नवऱ्याला फोनवरून ब्लॅकमेल आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती, असा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे.
या धक्कादायक घटनेच्या १६ दिवसांनंतर पोलिसांनी मृत ओमप्रकाश याची पत्नी आणि तिच्या चार मित्रांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
२९ एप्रिलला थाटामाटात झाले होते लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, पलवल येथील वली मोहम्मद पुर (लहरपुर) येथील रहिवासी असलेल्या ओमप्रकाश याचे लग्न २९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा (शेरगड) येथील रहिवासी असलेल्या भूमिका नावाच्या तरुणीसोबत रीतीरिवाजाप्रमाणे पार पडले होते. ३० एप्रिल रोजी संपूर्ण कुटुंब अत्यंत आनंदाने आणि उत्साहात सूनबाईला घेऊन घरी परतले. त्याच रात्री (३० एप्रिल) घरात मधुचंद्राच्या रात्रीची तयारी करण्यात आली होती. मात्र, याच रात्री ओमप्रकाश आणि भूमिका यांच्यात खोलीमध्ये कोणत्यातरी गूढ कारणावरून जोरदार वाद झाला. खोलीतून येणारे भांडणाचे आवाज घरातील इतर महिलांनीही स्पष्ट ऐकले होते.
१ मेच्या सकाळी चार नंबरवरून आले धमक्यांचे फोन!
मृतकाचे भाऊ जय भगवान यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुहागरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ओमप्रकाशच्या मोबाईलवर चार वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन येऊ लागले. फोन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून नवरी भूमिका हिच्या जवळचे मित्र अजय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम हे होते. हे चौघेही फोनवरून ओमप्रकाशला गंभीर परिणामास तयार राहण्याची धमकी देत होते, तसेच त्याला ब्लॅकमेल करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते.
घाबरलेल्या मुलाने वडिलांना सांगितली हकीकत
सतत येणाऱ्या या धमक्यांच्या फोनमुळे ओमप्रकाश आतून पूर्णपणे हादरला होता आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता. त्याने तात्काळ आपले वडील अशोक यांच्याकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला की, "भूमिकाचे मित्र मला सतत फोन करून त्रास देत आहेत." वडिलांनी मुलाला धीर देण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला. या दरम्यान जेव्हा कुटुंबियांनी सून भूमिका हिला विचारले, तेव्हा तिने साफ खोटे बोलत "ओमप्रकाशला कोणाचाही फोन आलेला नाही," असा दावा केला.
...अन् ओमीने रेल्वेसमोर घेतली उडी!
आरोपींकडून होणारा छळ आणि धमक्यांचा पाऊस थांबत नसल्याने हताश झालेल्या ओमप्रकाशने १ मे रोजी दुपारच्या सुमारास होडल रेल्वे स्टेशन गाठले. तिथे येणाऱ्या एका वेगवान ट्रेनसमोर त्याने थेट उडी मारली. ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. जीआरपी पोलिसांनी आता मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नी भूमिका, अजय, संजीव, नारायण आणि वेदराम यांच्याविरोधात नामजद एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.