पोस्टाची 'ही' स्कीम करेल तुम्हाला मालामाल; केवळ ३३३ रुपयांची गुंतवणूक, केवळ व्याजातूनच कमवाल ५ लाख; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:02 IST2026-02-06T08:55:02+5:302026-02-06T09:02:53+5:30

Post Office Investment Scheme: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा असं वाटतं. शेअर बाजार किंवा जोखमीची गुंतवणूक सर्वांनाच झेपते असे नाही, म्हणूनच सरकारी योजना आजही लोकांची पहिली पसंती आहेत.

Post Office Investment Scheme: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा असं वाटतं. शेअर बाजार किंवा जोखमीची गुंतवणूक सर्वांनाच झेपते असे नाही, म्हणूनच सरकारी योजना आजही लोकांची पहिली पसंती आहेत.

जर तुम्हालाही छोट्या बचतीतून मोठा निधी उभा करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची आरडी (RD) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. यामध्ये दिवसाला फक्त ३३३ रुपये वाचवून तुम्ही केवळ व्याजातून ५ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी (Post Office RD) ही एक सरकारी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो आणि व्याजाची हमी खुद्द सरकार देते. कमी उत्पन्न असणारे लोकही यामध्ये सहज गुंतवणूक करू शकतात. ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना जोखीम घ्यायची नाही, पण आपली बचत वाढताना पाहायची आहे.

सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर सरकारकडून वार्षिक ६.७% दरानं व्याज दिलं जात आहे. या योजनेत खाते केवळ १०० रुपयांपासून सुरू करता येतं. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो आणि गरज पडल्यास तुम्ही तो आणखी ५ वर्षांसाठी वाढवू शकता.

१८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती हे खातं उघडू शकते. यामध्ये सिंगल किंवा जॉइंट अकाउंटची सुविधा असून मुलांच्या नावे देखील आरडी सुरू करता येते.

या योजनेत दिवसाला ३३३ रुपये वाचवल्यास महिन्याची बचत सुमारे १०,००० रुपये होते. जर तुम्ही ही गुंतवणूक १० वर्षांसाठी केली, तर गणिते अतिशय फायदेशीर ठरतात. पहिल्या ५ वर्षांत तुमची एकूण जमा रक्कम ६ लाख रुपये होईल आणि त्यावर सुमारे १,१३,६५९ रुपये व्याज मिळेल, ज्यामुळे तुमचा एकूण निधी ७,१३,६५९ रुपये होईल.

मात्र, जर तुम्ही ही गुंतवणूक आणखी ५ वर्षे वाढवून १० वर्षे पूर्ण केली, तर तुमची एकूण गुंतवणुकीची रक्कम १२ लाख रुपये होईल. यावर तुम्हाला ५,०८,५४६ रुपये इतकं व्याज मिळेल आणि एकूण मॅच्युरिटी रक्कम १७,०८,५४६ रुपये इतकी होईल. म्हणजेच, तुम्ही जे ५ लाखांहून अधिक रुपये कमवले आहेत, ते केवळ व्याजातून मिळालेलं उत्पन्न आहे.

या योजनेची आणखी एक मोठी खासियत म्हणजे यात कर्जाची सुविधा देखील मिळते. खातं १ वर्ष जुनं झाल्यावर तुम्ही जमा रकमेच्या ५०% पर्यंत कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे या कर्जाचा व्याजदर आरडीच्या व्याजदरापेक्षा फक्त २% जास्त असतो, त्यामुळे तातडीच्या वेळी पैसे काढण्याची चिंता राहत नाही. याशिवाय, योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याचेही नियम आहेत. तुम्ही ३ वर्षांनंतर खातं बंद करू शकता. खातेदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनी पैशावर दावा करू शकतो किंवा गुंतवणूक पुढे सुरू ठेवू शकतो.