मंगळाचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींवर अपार कृपा; धनलाभाचे योग, उत्तम संधींचा शुभ-मंगलमय काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:59 AM2022-10-07T11:59:31+5:302022-10-07T12:04:18+5:30

मंगळाचा मिथुन राशीतील प्रवेश फारसा शुभ मानला गेला नसला तरी काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतात. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिने ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या राशीपरिवर्तानांपैकी महत्त्वाचा राशीबदल म्हणजे मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत होत असलेला प्रवेश. १६ ऑक्टोबर रोजी मंगळ राशीबदल करणार आहे. मंगळाचा मिथुन प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. (mars transit in gemini 2022)

मंगळ बुधचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करणार असून, यामुळे शनीसोबत षडाष्टक योग जुळून येत आहे. हा योग देश-दुनियेसाठी शुभ मानला गेलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. (mangal gochar in mithun rashi 2022)

मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी करिअरच्या दृष्टीने उत्कृष्ट संधी देऊ शकते. जे लोक बेरोजगार बसले होते, त्यांना मंगळाच्या शुभ प्रभावामुळे रोजगार मिळू शकतो. काही राशींसाठी, मंगळाचे संक्रमण प्रेम संबंधांमध्ये एक सुखद अनुभूती मानले जाते. कोणत्या राशींवर मंगळाच्या मिथुन प्रवेशाचा शुभ प्रभाव पडू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश चांगला ठरू शकेल. ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नोकरदारांना कार्यक्षेत्रात सुखद परिणाम मिळतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. कौटुंबिक जीवनातही समतोल राहील. या काळात सामाजिक स्तरावर तुमचे वर्चस्व वाढू शकते. राजकारणाच्या क्षेत्रात काम करत असाल तर समर्थक वाढू शकतात. भावंडांच्या माध्यमातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश लाभदायक ठरू शकतो. आगामी काळ व्यावसायिकांना आनंददायी ठरू शकतो. रखडलेल्या योजना पुन्हा चालू शकतात. त्यातून तुम्हाला लाभही मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. भावंडांच्या सहकार्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते.

कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश चिंतामुक्तीचा ठरू शकेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. या काळात व्यवसाय सुरू करू शकता. भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी आपण अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात तुम्ही तुमच्या वडिलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुम्ही त्यांच्याकडून काही चांगले शिकू शकता. आरोग्याबाबत थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खूप मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, असे सांगितले जात आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तुमच्या क्षमता वाढू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते. गूढ विषयांमध्ये तुमची आवड वाढेल. पर्यटनाच्या योजना आखू शकता. सासरच्या मंडळींशी संवाद वाढवावा. तसेच चर्चा करताना तारतम्य ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश स्वप्नपूर्तीचा ठरू शकतो. सामाजिक स्तरावर तुमची कीर्ती वाढेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमची ओळख होऊ शकते. नोकरी व्यवसायाशी संबंधित लोक कामाच्या ठिकाणी खूप सक्रिय असतील, तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. विवाहित लोकांच्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि रोमान्स वाढू शकतो. पार्टनरकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.