...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:21 AM2024-05-21T11:21:17+5:302024-05-21T11:21:43+5:30

Pune Accident - पुण्यातील कार अपघातात २ जणांचा बळी घेतलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी स्थानिक आमदाराने पोलिसांवर दबाव आणला असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यावर आमदार टिंगरेंनी त्यांची बाजू मांडली आहे.

...So I went to the police station; Big disclosure of NCP MLA Sunil Tingre in Pune accident case | ...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा

...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा

पुणे - MLA Sunil Tingare on Pune Accident ( Marathi News ) शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका पोर्शे कारनं २ जणांना चिरडले. त्यानंतर या घटनेतील आरोपींना तातडीने जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. त्यातच विरोधकांकडून या घटनेत सत्ताधारी आमदारांकडून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप पुण्यातील वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांना टार्गेट करण्यात येत आहे. मात्र या घटनेवर टिंगरे यांनी खुलासा केला आहे.

आमदार सुनिल टिंगरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितले. 

माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलिस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली असंही आमदार सुनिल टिंगरे यांनी म्हटलं. 

दरम्यान, या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मिडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरु असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारु विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलिस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवला आहे. तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलिस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेउनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सूज्ञ नागरीक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास आमदार सुनिल टिंगरे यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: ...So I went to the police station; Big disclosure of NCP MLA Sunil Tingre in Pune accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.