भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:50 PM2024-05-20T19:50:35+5:302024-05-20T19:53:35+5:30

आज सोमवारी राज्यातील १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

Bollywood Actress Vidya Malavade from the movie Chak De India on her voting experience today and singer amit trivedi also unhappy | भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं

Lok Sabha Elections 2024 : आज सोमवारी राज्यातील १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. देशभरातील पाचव्या टप्प्यातील मतदानाने राज्यातील मतदानाचा शेवट झाला. पण, निवडणूक आयोगावर रोष व्यक्त करताना दिवसभर अनेकांनी तक्रारी नोंदवल्या. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणूक अर्थात लोकशाहीचा सण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मतदानानंतर बोटावर शाई लावल्याचे फोटो सर्वजण आवडीने सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच अनेकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना याविरोधात आवाज उठवला. 

गायक अमित त्रिवेदी आणि अभिनेत्री विद्या माळवदे यांनी आपापल्या सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून मतदार ओळखपत्र असूनही मतदान केंद्रावर जाऊन मतदान कसे करू दिले नाही, याची संपूर्ण घटना सांगितली आहे. अमित त्रिवेदीने म्हटले की, आज मी मतदान करण्यासाठी गेलो होतो. तिथे मी त्यांना बूथच्या लोकांनी दिलेली पावती दाखवली आणि त्यावर नंबरही लिहिलेला होता. माझ्याकडे माझे मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड सर्वकाही होते. मात्र स्लिपवर लिहिलेला १०८० हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच बाहेरून जिथून आणले असेल तिथून दुरुस्त करून परत आणा असे सांगितल्यावर मी बाहेर गेलो, तिथे खूप मोठी रांग होती. अर्धा तास रांगेत थांबून मी पोहचलो तेव्हा एक माणूस अर्धा तास काही रजिस्टर तपासत होता. मी त्याला याबद्दल विचारणा केली. आपण आता डिजिटल युगात आहोत. इंटरनेटवर सर्व काही पाहायला मिळते. मग बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी फोन तपासला. माझे सर्व तपशील तपासले. मग म्हणाले, सॉरी नाही सर. तुम्ही मतदान करू शकत नाही. मी त्यांना विचारले मी का करू शकणार नाही? तर ते म्हणाले की, नाही सर, तुम्ही नाही करू शकत. माझ्यासारखे २००-३०० लोक निराश होऊन तिथून परतले. हे अनेक लोकांसोबत घडत आहे. मी मतदान करू शकलो नाही, असेही त्रिवेदीने सांगितले.

विद्या माळवदेने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, हे खूपच निराशाजनक आहे... मी माझ्या आई-वडिलांसोबत तीन तास मतदान केंद्रावर थांबले. पण, माझे मतदार यादीत नाव नव्हते तर मी कोणत्या भागातील रहिवासी आहे याचा देखील उल्लेख नव्हता. माझे पालक ज्येष्ठ नागरिक असताना देखील ते रांगेत उभे राहिले होते. मला माहीत नाही पण हे खूपच निराशाजनक आहे. कितीवेळा माझ्या घरी येऊन अधिकाऱ्यांनी आधारकार्डसह कागदपत्रांची नोंद करून घेतली आहे तरीदेखील असा प्रकार घडतो हे दुर्दैवच. मी नेहमी वांद्रे पश्चिम या मतदारसंघात मतदान करत असते. माझ्या आई-बाबांचे नाव होते पण माझे का नाही? मतदान करणे हे माझे कर्तव्य होते पण मी करू शकले नाही. 

Web Title: Bollywood Actress Vidya Malavade from the movie Chak De India on her voting experience today and singer amit trivedi also unhappy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.