नवी दिल्ली: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत विजयाचे श्रेय त्यांच्या दीर्घकाळाच्या परिश्रमांना दिले. पश्चिम बंगालमधील भाजपची ही ऐतिहासिक कामगिरी अनेक पिढ्यांपासून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाली आहे. मी सर्वांना सलाम करतो, असे उद्गार पीएम मोदींनी काढले.
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणेसह आपल्या भाषणाची सुरुवात करत हा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचे म्हटले. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आज देशातील २० हून अधिक राज्यांत एनडीए-भाजप सरकार कार्यरत आहे आणि नागरिकांच्या सेवेमुळेच जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पीए मोदी पुढे म्हणतात, “जिथे भाजप, तिथे सुशासन.” हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमधील विजयासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यशाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी यावेळी पुडुचेरीतील जनतेचे आभार मानत तेथील विकासासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचे म्हटले. तसेच आसाममध्ये तिसऱ्यांदा भाजपवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाला ऐतिहासिक घटना संबोधत राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, केरळ आणि बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड दडपशाही आणि अत्याचारांचा सामना केला आहे. आज बंगालमधील भाजपच्या यशाचे श्रेय मी अशा सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देतो. हा विजय मी बंगालच्या जनतेला समर्पित करतो. डॉ. श्यामाप्रसाद यांच्या आत्म्याला आता शांती लाभली. बंगालच्या जनतेने आम्हा भाजप कार्यकर्त्यांना, त्यांचे स्वप्नातील बंगाल साकार करण्याची संधी दिली आहे. आजपासून बंगालच्या नशिबात एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. जरी ४ मेची संध्याकाळ आता मावळत असली, तरी बंगालच्या या पवित्र भूमीवर एका नव्या पहाटेचा उदय झाला आहे.
गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळच कमळ फुलले आहे. गंगा किनाऱ्यावरील बहुतांश राज्यांत आता भाजप-एनडीएची सत्ता आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या विस्ताराचा उल्लेख केला. लोकशाहीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, जिंकणे आणि हारणे हे निवडणुकीचा स्वाभाविक भाग आहे. मात्र या निवडणुकांमधून भारत ‘लोकशाहीची जननी’ का आहे, हे पुन्हा जगासमोर आले आहे. लोकशाही ही केवळ व्यवस्था नसून ती आपल्या संस्कारांमध्ये रुजलेली आहे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा त्यांच्या दीर्घ साधनेचा परिणाम असल्याचे सांगत त्यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर जनतेचा वाढता विश्वास अधोरेखित केला.
Web Summary : PM Modi credited BJP workers for West Bengal and Assam's unprecedented victories. He emphasized the party's commitment to development in Puducherry and Assam. Modi dedicated Bengal's win to party workers facing oppression, hailing a new chapter for the state and India's democratic spirit.
Web Summary : पीएम मोदी ने पश्चिम बंगाल और असम में अभूतपूर्व जीत का श्रेय भाजपा कार्यकर्ताओं को दिया। उन्होंने पुडुचेरी और असम के विकास के लिए पार्टी की प्रतिबद्धता पर जोर दिया। मोदी ने बंगाल की जीत को उत्पीड़न का सामना करने वाले पार्टी कार्यकर्ताओं को समर्पित किया, और राज्य और भारत की लोकतांत्रिक भावना के लिए एक नया अध्याय बताया।