PM Modi: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्या पेहरावापासून ते भाषणापर्यंत सर्वच गोष्टींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बंगालमध्ये तब्बल १५ वर्षांची ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून भाजपने पहिल्यांदाच विजयाचा झेंडा फडकावला असून, या विजयाचा जल्लोष आज दिल्लीत पाहायला मिळाला.
पंतप्रधानाचा बंगाली लूक आणि राजकीय संदेश
पंतप्रधान मोदी हे नेहमीच आपल्या पेहरावातून एक विशिष्ट राजकीय संदेश देण्यासाठी ओळखले जातात. आजही त्याचा प्रत्यय आला. पंतप्रधान मोदींनी बंगालच्या पुरुषांचा पारंपारिक पेहराव असलेला पांढरा कुर्ता आणि तसर सिल्कचे धोतर नेसले होते. त्यांच्या धोतराला लाल रंगाची बॉर्डर होती. महत्त्वाचे म्हणजे, बंगाली परंपरेप्रमाणे त्यांनी धोतराचे एक टोक कुर्त्याच्या खिशात ठेवले होते. त्यांनी गळ्यात घातलेले सुती कापडाचे उपरणे देखील बंगालच्या संस्कृतीची ओळख करून देत होते.
मंचावर दिसली PM मोदींची खास झलक
भाजप मुख्यालयात जल्लोषाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी जेव्हा नितिन नबीन पंतप्रधानांना पुष्पहार घालण्यासाठी पुढे आले, तेव्हा मोदींनी तो हार स्वीकारला नाही, तर तो स्वतःच्या हाताने नितिन नबीन यांनाच घातला. या कृतीतून त्यांनी सर्वांची मने जिंकली.
"आजचा दिवस उज्ज्वल भविष्याची उद्घोषणा"; पंतप्रधान मोदींचे भाष्य
कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक आणि उत्साही दिसत होते. "आजचा हा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. जेव्हा अनेक वर्षांची साधना सिद्धीमध्ये बदलते, तेव्हा जो आनंद चेहऱ्यावर असतो, तो आज मी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहत आहे. हा विजय म्हणजे भारताच्या महान लोकशाहीवरील विश्वासाचा विजय आहे," असं पतप्रधान मोदी म्हणाले.
बंगालमध्ये भाजपची मुसंडी
भाजपने पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सरकार स्थापनेकडे पाऊल टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने ७७ जागांवर विजय मिळवला असून तब्बल १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण २०४ जागांवर भाजपची पकड मजबूत असून, ११८ हा बहुमताच्या आकडा पार केला आहे.