"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:40 IST2026-04-23T12:39:34+5:302026-04-23T12:40:54+5:30
TCS Nashik Case : 'एसआयटी'ने टीसीएस कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब घेतला असून या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली.

"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
'एसआयटी'ने टीसीएस कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब घेतला असून या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली. कंपनीत स्थानिक पातळीवरील नेटचे पासवर्ड देखील अश्लील भाषेत दिले जात होते. यातून अनेकदा धार्मिक भावना देखील दुखावल्या जात होत्या, अशी आपबिती या पीडितेने सांगितली.
मी तीन वर्षांपूर्वी कंपनीत ट्रेनी कर्मचारी म्हणून लागली होती. तेव्हा माझा रजा मेनन याने छळ केला, माझ्याशी तो अश्लील भाषेत संभाषण करू लागला. याविषयी मी ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्याकडे तोंडी तक्रार केली असता त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, मात्र यामुळे चिडलेल्या रजा याने अटकेतील आरोपी दानिश, तसेच तौसिफच्या सोबतीने माझा अधिक छळ सुरू केला. माझा डिजिटल पाठलाग केला, तसेच माझ्याबाबत नको ती अफवा कंपनीत पसरविली असा जबाब पीडितेने दिला आहे.
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
गुढीपाडव्याच्या दिवशी मी साडी नेसून कंपनीत गेली असता अश्लील संवाद साधला. रजा हा माझ्या ट्रेनी केबिनमध्ये प्रवेश करून माझ्याशी अश्लील बोलायचा. तसेच पदाचा दुरुपयोग करून मला कामावरून काढून टाकण्याचा दम द्यायचा, असा जबाब फिर्यादीने दिला. व्हॉट्सअॅपवर रात्री उशिरा तू काय करतेय, रात्री काय करते वैगेरे नको ते प्रश्न विचारून मानसिक छळ करायचा असा जबाब देखील संबंधित पीडितेने दिला आहे.
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
टीसीएसप्रकरणी दानिशचा अंतरिम जामीन फेटाळला
टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिग अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा अंतरिम जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावत अटकपूर्व जामिनासाठी पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे दानिशचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कटारे यांनी निकाल दिला. दानिश तसेच इतर सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. फरार निदा खान हिचाही अंतरिम जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर दानिश यालाही न्यायालयाच्या निर्णयाने ड्राटका बसला. या दोघांच्याही जामीन अर्जावर आता एकाच दिवशी सुनावणी होणार आहे.
"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
दानिशवर धार्मिक भावना दुखावणे तसेच महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप असून, त्याच्यावर दाखल एकूण नऊ गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी दिली.
दानिशच्या वकिलांनी दानिशवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याने अंतरिम जामीन देण्याची विनंती न्यायालयास केली. विशेष तपास पथकाच्या आधिकाऱ्यांनी न्यायालयात ठोस युक्तिवाद करत गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे अधोरेखित केले.