गाेंदिया, भंडाऱ्यात तुरळक पाऊस; कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज? कुठे पारा उसळण्याची शक्यता
By निशांत वानखेडे | Updated: May 5, 2026 20:27 IST2026-05-05T20:25:01+5:302026-05-05T20:27:14+5:30
Nagpur : प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यातील नागरिकांना मंगळवारी अखेर काहीसा दिलासा मिळाला. तापमान १ ते २.५ अंशापर्यंत घसरल्याने उष्णतेचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला.

Scattered rain in Gondia, Bhandara; In which district is rain forecast? Where is the possibility of mercury rising?
नागपूर : प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यातील नागरिकांना मंगळवारी अखेर काहीसा दिलासा मिळाला. तापमान १ ते २.५ अंशापर्यंत घसरल्याने उष्णतेचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला. यादरम्यान गाेंदिया जिल्ह्यात वादळासह आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. ब्रम्हपुरीतही तुरळक पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळासह पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. मात्र दाेन दिवस ढगांची उपस्थिती राहूनही उन्हाचे चटके व उकाड्याने छळले आहे. अखेर मंगळवारी सूर्याचा ताप घटला. नागपूरला सकाळपासून उन पडले हाेते, पण दुपारनंतर वातावरण बदलले व आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली हाेती. पाऊस हाेईल, अशी स्थिती हाेती, पण ढगांमधून सरी बरसल्या नाही. मात्र उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली. कमाल तापमान २.४ अंशाने खाली घसरत ४०.८ अंशाची नाेंद झाली. अनेक दिवसानंतर तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने खाली आल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. सायंकाळचे वातावरणही आल्हाददायक झाले. रात्रीचे तापमान २.४ अंशाने खाली आले.
गाेंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जाेराचे वादळ आले. काही ठिकाणी पाऊस झाल्याचीही माहिती आहे. मात्र शहरात पावसाची नाेंद झाली नाही. तापमान मात्र २.५ अंशाने घसरत ४० अंशाच्या खाली ३८ अंशावर पाेहचले. भंडारा जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्याची माहिती आहे. येथे तापमान २ अंशाने खाली घसरत ३९ अंशावर पाेहचले आहे. ब्रम्हपुरीला ०.६ मिमी पावसाची नाेंद झाली. साेमवारी देशात सर्वाधिक उष्ण असलेल्या ब्रम्हपुरीचे तापमान २ अंशाने घसरून ४२.२ अंशावर आले. इतर जिल्ह्यातही अंशत: घट झाली आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अवकाळीचे ढग आणखी एक दिवस आकाशात असतील. त्यामुळे एक दाेन दिवस उकाड्याचा त्रास कमी जाणवेल. त्यानंतर मात्र पारा ३ ते ५ अंशाने उसळण्याची शक्यता असून उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.