CoronaVirus News : कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणातून आपण काय शिकलो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 04:01 PM2020-05-25T16:01:11+5:302020-05-25T16:14:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: शालेय शिक्षण क्षेत्राने कोरोनासारख्या संकटाला अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी काही मुद्यांकडे लक्ष देणे आवश्यक वाटते.

CoronaVirus Marathi News What did you learn online education Corona SSS | CoronaVirus News : कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणातून आपण काय शिकलो?

CoronaVirus News : कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणातून आपण काय शिकलो?

googlenewsNext

संतोष सोनवणे

कोविड-१९ या विषाणूमुळे सारे जग टाळेबंदीच्या गर्तेत अडकले आहे. देशाच्या आजच्या आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक देश आणि तेथील विविध विषयांचे तज्ज्ञ आपापल्या भूमिका मांडत आहेत. यात उद्योग, कृषी, आरोग्य आणि शिक्षण यावर मोठ्या प्रमाणावर भाष्य होताना दिसून येत आहे.

कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावातून बाहेर पडताना ‘शिक्षण’ या भविष्यकालीन गुंतवणुकीबाबत विशेषत: प्राथमिक शिक्षणात ‘ऑनलाईन शिक्षण’ या विचाराने खूप वेगाने आणि घाईने मुलांच्या मेंदूचा आणि पालकांच्या मोबाइलचा ठाव घेतला असल्याचे लक्षात आले असेल. खरंतर, आजचे जग खूप बदलले आहे. सेवा क्षेत्र, उद्योग यात तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती निश्चितच उल्लेखनीय आहे. ही प्रगती एका दिवसात झालेली नाही. गरज त्याचे महत्त्व अधोरेखित करून माणसानेच त्यात ही प्रगती साधली आहे. साधे बँकिंग क्षेत्र घ्या! आज कोरोनामुळे या क्षेत्रावर इतर क्षेत्राच्या मानाने तितकासा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. याचे कारण भविष्याची गरज ओळखून त्यचे महत्त्व वाढवून केलेले काम आज उपयोगी ठरत आहे. मात्र, शालेय शिक्षणासंदर्भात काही मूलभूत गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या बदलांकडे दुर्लक्ष केल्याचे आपल्या लक्षात येते. आजही आपण त्याच साचेबद्ध पद्धतीत अडकलो आहोत. शालेय शिक्षण क्षेत्राने कोरोनासारख्या संकटाला अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी काही मुद्यांकडे लक्ष देणे आवश्यक वाटते.

सक्षम मनुष्यबळ आणि अध्यापनशास्त्र 

लवकरच आपण कोरोनावर मात करून नियमित जगण्याकडे आपला प्रवास सुरूही करू. मात्र, मुळात गरज आहे ती, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या बदलत्या परिस्थितीत आपण खरंच १०० टक्के शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम होतो का, या प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याची. शिकविणे ही एक कला आहे, कौशल्य आहे. ते एक शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करावाच लागतो. केवळ माहिती आणि ज्ञान या पातळीवर केलेली तयारी अध्यापनात अपुरी पडते. शिकून घेणे, समजून घेणे आणि त्याचा सराव असणे, हे सारे आवश्यक असते. वर्गात मुलांच्या समोर अध्यापन करणे आणि त्याच मुलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकविणे हे काही मूलभूत फरक आहेत. हे फरक समजून घेणे किंवा समजून देणे आवश्यक आहे. नाहीतर, तहान लागली म्हणून विहीर खोदण्यासारखे होईल. तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित साधने- जसे स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट, स्मार्ट टीव्ही, रेडिओ यांची उपलब्धता, त्यांचा वापर आणि निगा याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मानसिकता तयार करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वर्गातील अध्यापन आणि ऑनलाईन अध्यापन या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला तयार व्हावे लागेल. या आघाड्या सांभाळण्यासाठी शिक्षकांना अधिक तयार करावे लागेल.

भविष्यकालीन आवश्यक शिक्षण 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ऑनलाईन  शिक्षणाच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी आपले प्रयत्न हे केवळ माहिती आणि ज्ञान देण्यापुरते मर्यादित राहू नयेत. कारण, एकविसाव्या शतकासाठीची आवश्यक कौशल्ये मुलांच्या अंगी रुजविण्याचे प्रयत्न करतोय, असे आपण म्हणतो. त्याच वेळी कौशल्ये रुजविणे, या संकल्पनेचा बारकाईने विचार करायला हवा. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा जाणार आहेत. अशावेळी तरुणांनी काय विचार करावा? काय निर्णय घ्यावे? या समस्येला कसे तोंड द्यावे? पर्याय कसे शोधावेत? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये शिक्षणाने निर्माण करायला हवे. त्याकरिता आपल्या देशातील शिक्षण मंडळांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

आज कोरोना आला म्हणून आपण सारे अशाप्रकारे विचार करायला लागलो. खरंतर, बदलत्या जगाची नस ओळखून आपण तयार व्हायला हवे. आज कोरोना एक आव्हान आहे. ते परतून लावताना मूलभूत गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. जगाचे भविष्य घडविणाऱ्या ‘शिक्षण’ या अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकीकडे केवळ गरजेनुसार मलमपट्टी या दृष्किोनातून पाहणे योग्य होणार नाही.

(लेखक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथे कार्यरत असून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

(संकलन : स्रेहा पावसकर)

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

Web Title: CoronaVirus Marathi News What did you learn online education Corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.