CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:34 AM2020-05-25T08:34:38+5:302020-05-25T08:52:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान लोकांना आता कोरोनाची नाही तर आणखी एका गोष्टीची भीती वाटत आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही एक लाखांवर गेली असून 3800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे.

भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान लोकांना आता कोरोनाची नाही तर आणखी एका गोष्टीची भीती वाटत आहे.

लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त चिंता असल्याची माहिती आता समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) लखनऊने केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

आयआयएम लखनऊने Understanding public sentiment during lockdown या विषयावर एक ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात लोकांना आपल्या भविष्याविषयी सर्वात जास्त चिंता वाटत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तब्बल 79 टक्के लोकांना या गोष्टींची चिंता आहे. तर 40 टक्के लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तर 22 टक्के लोक दु:खी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आयआयएमच्या सेंटर फॉर मार्केटिंग इन इमर्जिंग इकॉनमिक्स (सीएमईई) ने या सर्व्हेत 23 राज्यांतल्या 104 शहरांमधल्या लोकांनी सहभाग घेतला होता.

मंदीतली अर्थव्यवस्था, कर्ज, आरोग्यावरचा खर्च वाढणार आहे, लोकांचा व्यवहार कसा बदलेल याची लोकांना आता चिंता लागलेली आहे. तसेच महागाई वाढेल याची लोकांना भीती वाटत आहे.

अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत.

छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशी दैनंदिन कमाई करणाऱ्या मजुरांचा रोजगार हा लॉकडाऊनमुळे गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.