CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:16 PM2020-05-25T13:16:43+5:302020-05-25T13:52:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काही कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोनाच्या संसर्गाने भयानक वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ नोंदवली गेली.

गेल्या तासांत कोरोनाचे तब्बल सहा हजार 977 नवे रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहोचली आहे. तर 154 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या झाली 4021 आहे. आतापर्यंत 57 हजार 20 जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थिती देशात कोरोनाचे 77 हजार 103 रुग्ण आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काही कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मधुमेह, श्वासोच्छवास आणि फुप्फुसांसंबंधित आजार आणि अन्य गंभीर आजार असण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे.

रिसर्चमधून याबाबत माहिती मिळत आहे. बीएमजेनुसार 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेले, पुरुष, स्थुलत्व, ह्रदयरोग, फुप्फुस, मूत्रपिंड आदी संदर्भातील आजार असलेल्या कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक असतो

ब्रिटेनचे लिव्हरपूल विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांसह अन्य सर्वांनी इंग्लंडमधील रुग्णालयात भरती झालेले कोविड 19 रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. यामध्ये 43000 हून जास्त रुग्णांचा सहभाग करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिलदरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील 208 रुग्णालयात भरीत झालेल्या 20133 रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले.

अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झालेल्यांचे वय सर्वसाधारण 73 होते आणि महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. वयाबरोबरच ज्यांना ह्रदय, फुप्फुस, यकृत. मूत्रपिंड आदीबाबत आजार असलेल्यांना अधिक त्रासाचा सामना करावा लागत होता.

कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयानुसार, मृत्यूच्या विश्लेषणानुसार कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांमध्ये 64 टक्के पुरुष आणि 36 टक्के महिला आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.

देशात कोरोनाची लस तयार करण्यावरही वैज्ञानिक दिवसरात्र काम करत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाच महिन्यांच्या आत 4 लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं अशी माहिती दिली आहे.