छत्रपती संभाजीनगर : जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटा-किर्लोस्कर मोटार्सने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या(डीएमआयसी) बिडकीन औद्योगिक पट्ट्यात इलेक्ट्रिक चारचाकी वाहन उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या प्रकल्पातून सन २०२९ च्या पहिल्या सहा महिन्यांत उत्पादनाला सुरुवात होणार आहे.
दरवर्षी एक लाख वाहनांचे उत्पादन करण्याचे नियोजन कंपनीने केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. टोयोटा-किर्लोस्कर मोटार्सने छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा जुलै २०२४ मध्ये केली. तेव्हापासून मराठवाड्यातील उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण आहे. या प्रकल्पासाठी कंपनी टप्प्याटप्प्याने २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीने बिडकीन डीएमआयसीमध्ये तब्बल ८२७ एकर जमीन खरेदी केली आहे. जमीन ताब्यात घेतल्यानंतर कंपनीकडून तेथे प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
प्रारंभी २ हजार ८०० रोजगारनिर्मिती
याविषयी कंपनीने संकेतस्थळावर अधिक माहिती देताना नमूद केले की, बिडकीन येथील प्रकल्पात स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग आणि असेंब्ली अशा अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारल्या जाणार आहेत. येथे नव्या एसयूव्ही मॉडेलचे उत्पादन केले जाणार असून, प्रारंभी सुमारे २ हजार ८०० रोजगार निर्माण होणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
येथून निर्यात होणार...
हा प्रकल्प देशांतर्गत आणि शेजारील देशांतील वाढत्या वाहन मागणीची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. भारत आणि शेजारील देशातील भविष्यातील मागणी व बदल लक्षात घेऊन उत्पादन क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी कंपनीकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर या प्रकल्पाविषयी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वाहन उद्योगाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचेही नमूद करण्यात आले. स्थानिक समुदाय आणि विविध घटकांच्या सहकार्याने भारतातील वाहन उद्योग आणि समाजाच्या विकासात योगदान देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Summary : Toyota will manufacture 1 lakh electric cars annually in Bidkin DMIC, Marathwada, starting 2029. A ₹25,000 crore investment will create 2,800 jobs, boosting local industry and exports. The plant will feature advanced stamping, welding, painting, and assembly facilities for new SUV models.
Web Summary : टोयोटा 2029 से मराठवाड़ा के बिडकिन डीएमआईसी में सालाना 1 लाख इलेक्ट्रिक कारों का उत्पादन करेगी। ₹25,000 करोड़ का निवेश 2,800 नौकरियां पैदा करेगा, जिससे स्थानीय उद्योग और निर्यात को बढ़ावा मिलेगा। प्लांट में नई एसयूवी मॉडल के लिए उन्नत उत्पादन सुविधाएं होंगी।