- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : श्वास... तोही आता थकून गेलाय. डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यालाही आता कोरड पडली. दैवत वृद्धाश्रमात अंथरुणाला खिळलेली एक वृद्ध आई शेवटच्या घटका मोजत आहे. मेंदूच्या विकारामुळे स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या या माऊलीची कहाणी ऐकली, तर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. काही आठवत नसले तरी तिचे डोळे मुलाच्या वाटेकडे लागलेले आहेत, जो तिला वाऱ्यावर सोडून निघून गेला आहे.
१४ फेब्रुवारीला मेंदूतील इन्फेक्शनमुळे शांताबाईंना शासकीय (घाटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत मुलगा होता. आईच्या आजारपणात सुरुवातीचे १० दिवस तो अगदी सावलीसारखा तिच्यासोबत राहिला. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. जशी शांताबाईंची प्रकृती खराब होत गेली, त्यांच्या पायात गँगरीन झाले, तसा मुलाला तिचा भार वाटू लागला. ज्या हातांनी त्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच असहाय्य हातांना रुग्णालयाच्या बिछान्यावर तसंच सोडून तो निघून गेला... तो कायमचा.
आजींचे जेवण बंद
शांताबाईंची केविलवाणी अवस्था पाहून घाटीतील सामाजिक कार्यकर्त्यांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी ‘दैवत वृद्धाश्रमा’च्या संचालिका उमा तुपे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी २ मे रोजी शांताबाईंना वृद्धाश्रमात आणत त्यांच्या उपचाराची, संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. पण शांताबाईंची अवस्था आता नाजूक आहे. मेंदूच्या आजारामुळे त्यांची स्मरणशक्ती हरवली. त्या स्वतःहून काहीच करू शकत नाहीत, एकाच जागेवर खिळून आहेत. त्यांचे जेवणही पूर्णपणे बंद झालेय.
पत्ता निघाला खोटा
आईला वाऱ्यावर सोडणाऱ्या त्या मुलाचा सुरुवातीला लागणारा फोन आता बंद झालाय. रुग्णालयात त्याने दिलेला बदनापूर तालुक्यातील गावाचा पत्ता... तोही खोटा निघाला. वृद्धाश्रमाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीच्या नात्याने बदनापूर तालुक्यात जाऊन पाहणी केली, शोध घेतला, पण पदरी निराशाच पडली. रक्ताचे नाते असे कसे फसवू शकते? स्वतःच्या आईला कोणी असे मरणाच्या दारात सोडून कसे जाऊ शकते? हे प्रश्न वृद्धाश्रमातील प्रत्येकाच्या मनाला चटके देत आहेत.
कागदपत्र देऊन जावे, आम्ही सांभाळतो
माझे एवढेच म्हणणे आहे की, मुलाने एकदा समोर यावे आणि आपल्या आईचे कमीत कमी कागदपत्रं तरी वृद्धाश्रमात जमा करावेत. आम्ही तिला शेवटपर्यंत सांभाळायला तयार आहोत, मुलावर आम्ही कोणतेही ओझे टाकणार नाही. पण आईची आताची परिस्थिती पाहता त्यांना काहीही होऊ शकते. अशा वेळेस पुढील सोपस्कारांसाठी तिची कागदपत्रे महत्त्वाची आहेत.
- उमा तुपे, संचालिका, दैवत वृद्धाश्रम
Web Summary : Ailing, memory-lost mother awaits her son in an old age home. He abandoned her after her health worsened, providing a false address. The old age home pleads for him to provide her documents.
Web Summary : अंतिम साँसें ले रही माँ वृद्धाश्रम में बेटे का इंतजार कर रही है। बीमारी बढ़ने पर बेटा उसे छोड़ गया, पता भी गलत दिया। वृद्धाश्रम ने उससे माँ के दस्तावेज़ जमा करने की गुहार लगाई है।