परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:40 IST2026-04-18T16:36:50+5:302026-04-18T16:40:36+5:30
Parashuram Jayanti 2026: अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंतीदेखील साजरी केली जाते, ज्यांना कोकणचा रक्षणकर्ता म्हणतात; त्यांचे मंदिर खुद्द आदिलशहाने बनवून घेतले होते!

परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
शस्त्र आणि शास्त्रात पारंगत अशी भगवान परशुराम यांची ओळख आहे. अक्षय्य तृतीयेच्या(Akshaya Tritiya 2026) दिवशी त्यांचा जन्म झाला. म्हणून ही तिथी भगवान परशुराम यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या मातृ-पितृ भक्तीचे दाखले आजही दिले जातात. अधर्मीयांविरुद्ध युद्धास उभे ठाकून त्यांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, असे पुराणात वर्णन आहे. याचाच अर्थ त्यांचे केवळ अधर्मी क्षत्रियांशी वैर होते. बाकी ते सज्जनांशी सज्जन आणि दुर्जनांशी दुर्जन होऊनच वागत असत. वैदिक धर्माचा, संस्कृतीचा प्रचार, प्रसार करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.
असे म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामानी समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाना सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.
केरळची भुमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फुट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात.
मंदिराच्या रचनेमध्ये मुगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी -
एकदा आदिल शहाच्या बेगमची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस केला, की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन, त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरुपपणे किना-याला लागली आणि परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.
आजही परशुरामांच्या कृपेमुळे समुद्रालगतचा समस्त प्रदेश सुखी, समाधानी, संपन्न आहे. म्हणून आजही अक्षय्य तृतीयेपासून तीन दिवस परशुरामाचा उत्सव साजरा केला जातो. आपणही त्यांच्याकडून बळ, बुद्धी, शक्ती, तेज मागुया आणि १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंती(Parashuram Jayanti 2026) साजरी करूया.