अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:19 IST2026-04-18T16:17:44+5:302026-04-18T16:19:22+5:30
Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला अक्षय्य पुण्य प्राप्तीसाठी, तसेच धन, धान्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी!

अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला 'साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त' मानले जाते, म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा विशेष मुहूर्त काढण्याची गरज नसते. या सणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अक्षय्य तृतीया २०२६: तारीख आणि तिथी(Akshaya Tritiya 2026 Date and Muhurat)
यंदा अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2026) रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
तृतीया तिथी प्रारंभ: १९ एप्रिल २०२६, सकाळी १०. ५० मिनिटांनी सुरु होईल
तृतीया तिथी समाप्ती: १९ एप्रिल २०२६, सकाळी ७. २६ मिनिटांनी संपेल.
अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना अर्घ्य देणेही अत्यंत फलदायी मानले जाते.
अक्षय्य तृतीया पूजा विधी :
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेची सुरुवात ब्रह्म मुहूर्तावर उठून करावी. स्नानादी नित्यकर्मे उरकल्यानंतर शुभ्र किंवा पिवळी वस्त्रे परिधान करावीत आणि मनोभावे पूजेचा संकल्प सोडावा. पूजेचे स्थान गंगाजलाने शुद्ध करून एका पाटावर लाल किंवा पिवळे कापड पसरून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा तसबिरीची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करावी.
पूजेच्या मुख्य विधीमध्ये सर्वप्रथम देवांना पंचामृताने आणि त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर देवांना गंध, अक्षता आणि फुले अर्पण करून षोडशोपचार पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळशीची पाने अत्यंत प्रिय असल्याने ती आवर्जून अर्पण करावीत, तर माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करावे. यावेळी मनामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचे स्मरण करत राहणे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा
पूजेमध्ये नैवेद्याला विशेष महत्त्व असून या दिवशी प्रामुख्याने गूळ-धणे, कैरीचे पन्हे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी सूक्ताचे श्रद्धेने पठण करावे. पूजेच्या शेवटी तुपाच्या दिव्याने मनोभावे आरती करावी आणि कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमाप्रार्थना करून प्रसन्न मनाने पूजेची सांगता करावी.
सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2026 Shubh Muhurat)
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. १९ एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळा अत्यंत फलदायी ठरतील:
सकाळचा मुहूर्त: सकाळी ६:१० ते दुपारी १२:२५ पर्यंत.
संध्याकाळचा मुहूर्त: दुपारी ४:३० ते सायंकाळी ७:०० पर्यंत.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
अक्षय्य तृतीयेचे विशेष 'पितृ तर्पण'
या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करणे (उदकुंभ दान) महत्त्वाचे मानले जाते. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरून, त्यात वाळा आणि गंगाजल घालून ते पितरांच्या नावाने दान करावे. यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते आणि कुटुंबाला सुख लाभते असे मानले जाते.