सांगली : कधीकाळी मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री असलेल्या सांगली जिल्ह्याला यंदा कोणतेही मंत्रिपद नसले तरी जिल्ह्यात मंत्र्यांचा राबता मात्र कायम आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील व केंद्रातील मंत्र्यांचा सतत जिल्ह्यात दौरा असतो. या दौऱ्याच्या निमित्ताने होणारा इंधन खर्च, ताफ्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, वाहनांची देखभाल दुरुस्ती यावर तब्बल २५ लाख रुपयांचा चुराडा दर महिन्याला होतो. जिल्हाधिकारी कार्यालयात खास मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी ठेवलेल्या वाहन व चालकांवर वर्षभरात ४ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्र्यांच्या दौऱ्यावरील खर्च कमी होणार का, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे जिल्ह्यात सतत दौरे असतात. त्यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांच्यासाठी वाहने व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते. याशिवाय कोणत्याही मंत्र्यांच्या दौऱ्यात संबंधित पक्षांचे आमदार, नेते, पदाधिकारी यांचीही वाहने ताफ्याच्या मागे असतात. त्यामुळे वाहनांच्या माध्यमातून प्रचंड इंधन जाळले जाते. आता याच इंधनाची बचत मंत्रिस्तरावर व दौऱ्यातून कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांच्या ताफ्यात तीन वाहने
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यात पुढे एक व मागे दोन अशी तीन शासकीय वाहने असतात. विशेष शाखेचे एक, पोलिस ठाण्याचे एक व स्पेशल स्कॉडचे एक अशी ही तीन वाहने आहेत. प्रत्येक वाहनात ६ याप्रमाणे १८ कर्मचारी व चालक या दौऱ्यात असतात. कर्मचारी पगार, इंधन खर्च, वाहनांची देखभाल दुरुस्ती याचा विचार केला तर अंदाजे दरमहा २५ लाख रुपये खर्च होतो.
जिल्हा प्रशासनाकडे वाहन, चालक राखीव
जिल्हा प्रशासनाकडे सध्या कोणत्याही मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वाहन राखीव असून प्रतिनियुक्तीवर चार चालक ठेवण्यात आले आहेत. यांना केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी नियुक्त केले गेले आहे. येथील वाहन व त्याच्या देखभालीवर एका वर्षात ४ लाख ६० हजार इतका खर्च झाला आहे. ही वाहने तसेच पोलिसांची वाहनेही वातानुकूलित असतात. ८ ते १० किलोमीटर प्रतिलिटर इतके त्यांचे ॲव्हरेज आहे.
जिल्ह्यात मंत्र्यांचा राबता
एप्रिल व मे महिन्यात सांगली जिल्ह्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्र्यांनी १० दिवसांचा दौरा केला.
पालकमंत्र्यांचे दौरे सर्वाधिक
पालकमंत्री म्हणून सतत आढावा बैठकीला चंद्रकांत पाटील यांना यावे लागते. महिन्यातून किमान ५ वेळा त्यांचा दौरा होतो. मागील दोन महिन्यांत ते १० दिवस जिल्ह्यात होते.
आजच्या दौऱ्याकडे लक्ष
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याच्या तपशिलानुसार सुमारे ४० ते ४५ किलोमीटर ते फिरणार आहेत. त्यांच्या ताफ्यात पुन्हा शासकीय वाहनांचा तसेच खासगी वाहनांचा समावेश असणार की पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत ते हा खर्च कमी करणार, या उत्सुकतेचा विषय आहे.
Web Summary : Despite no minister from Sangli, lavish spending persists. Minister visits cost ₹25 lakh monthly on fuel, staff, and vehicle maintenance. District administration spent ₹4.6 lakh on minister travel vehicles annually. Focus on reducing expenses after PM's appeal.
Web Summary : सांगली जिले से कोई मंत्री नहीं होने पर भी, मंत्रियों के दौरे पर भारी खर्च जारी है। ईंधन, कर्मचारियों और वाहनों के रखरखाव पर हर महीने ₹25 लाख खर्च होते हैं। प्रधानमंत्री की अपील के बाद खर्च कम होने की उम्मीद है।