India Russia News:रशियाच्या पुरवठ्यामुळे भारताच्या हिताला बाधा पोहोचणार नाही. काही झाले तरी काही अन्याय्य आणि अनैतिक स्पर्धेमुळे आमच्यातील करारांवर परिणाम होणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. रशियाभारताला गॅस, तेल आणि कोळसा यांसारख्या हायड्रोकार्बन्सचा पुरवठा करत आहे आणि भविष्यात हे सहकार्य अधिकच दृढ होईल, अशी मोठी गॅरंटी रशियाकडून देण्यात आली आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे जगावर इंधन संकट ओढावले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचे आवाहन केले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाने दिलेले आश्वासन महत्त्वाचे ठरत आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित सर्व करार कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जातील. अन्यायकारक आणि अप्रामाणिक स्पर्धा असूनही भारताच्या हिताला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची रशिया दक्षता घेईल, असे लावरोव्ह यांनी नमूद केले. भारत दौऱ्यापूर्वी एका मुलाखतीत लावरोव्ह बोलत होते.
कोणत्याही परिस्थितीत भारत आणि रशिया यांच्या संबंधांत अंतर पडणार नाही
पंतप्रधान मोदी यांच्याकडे ऊर्जावान नेते आहेत. याचा उपयोग ते महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी करतात. अर्थव्यवस्था, सैन्य, संरक्षण, संस्कृती किंवा भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन असो, भारत आपले सार्वभौमत्व मजबूत करण्यासाठी सातत्याने पुढे वाटचाल करत आहे. या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रमुख भूमिका बजावत आहेत. भारत-रशिया या दोन्ही देशांमधील संबंध दृढ मैत्रीवर आधारित आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवली, तरी भारत आणि रशिया या देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधात कधी अंतर येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हिंदी-रशियन 'भाई-भाई' हे दोन्ही देशांच्या संस्कृतीचा एक भाग
भारत-रशिया संबंधांबद्दल बोलताना लावरोव्ह म्हणाले की, हिंदी-रशियन 'भाई-भाई' ही केवळ एक राजकीय घोषणा नसून, ती दोन्ही देशांच्या संस्कृतीचा एक भाग बनली आहे. भारतीय चित्रपटसृष्टी, राज कपूर आणि अलीकडील टीव्ही मालिका व चित्रपट रशियाच्या कानाकोपऱ्यात प्रचंड लोकप्रिय आहेत. आमचे संबंध खडकासारखे मजबूत आहेत. कोणत्याही दबावाखाली ते तुटू शकत नाहीत. काही शक्ती रशिया-भारत संबंधांना कमकुवत करण्याचा आणि स्वतःचे नियम लादण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहेत. आम्ही हे सर्व पाहतो आणि आमचे भारतीय मित्रही हे पाहतात. यामुळेच आमची मैत्री अधिक घट्ट आणि मौल्यवान बनत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियन तांत्रिक मदतीने तामिळनाडूमध्ये उभारण्यात येत असलेल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा दोन्ही देशांमधील सहकार्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून उल्लेख केला. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा आमचा प्रमुख प्रकल्प आहे. तो भारताच्या ऊर्जेच्या गरजांचा मोठा भाग पूर्ण करतो. या प्रकल्पांतर्गत नवीन वीज युनिट्सच्या बांधकामावर सहकार्य सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत आर्थिक, संयुक्त ऊर्जा उत्पादन, लष्करी सहकार्य, अणुऊर्जा, सांस्कृतिक आणि मानवतावादी संबंध आहेत, तसेच उच्चस्तरीय राजकीय संवादही आहे. दोन्ही देशांमधील विश्वास इतका दृढ आहे की त्यात फूट पडण्याची कल्पनाही करता येत नाही, असे ते म्हणाले.
Web Summary : Russia guarantees uninterrupted energy supplies to India, dismissing unfair competition. Despite global fuel concerns and geopolitical tensions, Russia pledges unwavering support, reinforcing strong bilateral ties across energy, defense, and cultural sectors, exemplified by the Kudankulam project. Relations remain steadfast.
Web Summary : रूस ने भारत को निर्बाध ऊर्जा आपूर्ति की गारंटी दी, अनुचित प्रतिस्पर्धा को खारिज किया। वैश्विक ईंधन चिंताओं और भू-राजनीतिक तनावों के बावजूद, रूस ने अटूट समर्थन का वादा किया, ऊर्जा, रक्षा और सांस्कृतिक क्षेत्रों में मजबूत द्विपक्षीय संबंधों को मजबूत किया, जैसा कि कुडनकुलम परियोजना द्वारा उदाहरण दिया गया है। रिश्ते अटूट बने हुए हैं।