बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने माणुसकीला काळीमा फासला आहे. अस्थावां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकरावां गावात लिंबूसाठी एका १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर गावात मोठा गोंधळ झाला असून संपूर्ण भागाचं पोलीस छावणीत रूपांतर झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कुमार उर्फ झगडू हा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता त्याने शेजारी राहणाऱ्या गोरख मियाच्या घरातील झाडावरचा एक लिंबू तोडला. या किरकोळ कारणावरून आरोपी इतका संतापला की, त्याने या चिमुकल्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. डोकं फुटल्यामुळे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात नेलं जात असतानाच शुभमचा मृत्यू झाला.
गावात हिंसाचार आणि पोलिसांवर दगडफेक
मुलाच्या मृत्यूची बातमी पसरताच शेकडो ग्रामस्थ 'हत्येचा बदला हत्या' अशा घोषणा देत आरोपीच्या घराकडे धावले. संतप्त जमावाने ३-४ घरांचे दरवाजे तोडले आणि वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त लोकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून सुरक्षा दलांना लाठीचार्ज करावा लागला.
६० पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात
गावातील वाढता तणाव पाहता पाटणा आणि नालंदा जिल्ह्यातील सुमारे ६० पोलीस ठाण्यांचे पोलीस, क्यूआरटी (QRT) फोर्स आणि ५०० हून अधिक सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्हा दंडाधिकारी कुंदन कुमार आणि पोलीस अधीक्षक (SP) भारत सोनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जातीय सलोखा बिघडू नये यासाठी गुप्तचर यंत्रणा एक्टिव्ह करण्यात आली असून दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१२ जणांना अटक
पोलीस अधीक्षक भारत सोनी यांनी सांगितलं की, या प्रकरणात कारवाई करत आरोपी कुटुंबातील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. एफएसएल (FSL) टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन एसपींनी दिलं आहे. सध्या गावात शांतता राखण्यासाठी पोलीस दल फ्लॅग मार्च करत आहे.
Web Summary : In Bihar, a 12-year-old boy was murdered over a lemon. The enraged villagers attacked the accused's house and clashed with police, resulting in injuries. Authorities have arrested twelve people and deployed forces to maintain peace.
Web Summary : बिहार में एक 12 वर्षीय लड़के की नींबू के लिए हत्या कर दी गई। आक्रोशित ग्रामीणों ने आरोपी के घर पर हमला किया और पुलिस से भिड़ गए, जिससे कई घायल हो गए। अधिकारियों ने बारह लोगों को गिरफ्तार किया और शांति बनाए रखने के लिए बलों को तैनात किया।