घरामध्ये एकटी असल्याचे पाहून नराधमाचा मतिमंद तरुणीवर अत्याचार, पुण्यातील आणखी एक संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:28 IST2026-05-08T16:24:02+5:302026-05-08T16:28:19+5:30
दुर्गम डोंगर भागामध्ये ही अपंग व मतिमंद तरुणी आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे, तरुणी तिच्या घरामध्ये एकटी असल्याचे पाहून तिच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाने जबरदस्तीने अत्याचार केला

घरामध्ये एकटी असल्याचे पाहून नराधमाचा मतिमंद तरुणीवर अत्याचार, पुण्यातील आणखी एक संतापजनक घटना
पिरंगुट : दिवसेंदिवस महिला आणि बालिकेच्या अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असतानाच मुळशी तालुक्यामध्ये देखील एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका २६ वर्षीय युवकाकडून एका अपंग व मतिमंद तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या या नराधमास पौड पोलिसांनी नुकत्याच बेडया ठोकल्या आहेत.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुळशी तालुक्यातील मांडवखडक (वेगरे) या अति दुर्गम डोंगर भागामध्ये ही अपंग व मतिमंद तरुणी आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे. परंतु २२/०४/२०२६ रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ही तरुणी तिच्या घरामध्ये एकटी असल्याचे पाहून तिच्या शेजारीच राहणारा आरोपी गजानन भागू पवार (वय २६ वर्ष रा. मांडवखडक वेगरे, ता. मुळशी) या नराधमाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तेथून पसार झाला. या घटनेनंतर याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनं मध्ये या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा आरोपी हा कातकरी समाजाचा व डोंगराळ भागात राहणारा असल्याने त्याला शोधणे हे मोठे आव्हान बनले होते. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांच्या वतीने सपोनी कदम, पो.हवा. रॉकी देवकाते, पो.हवा. निवास जगदाळे, पो हवा वैभव सुरवसे आणि पो.शि. नवनाथ शिंदे यांची तपास पथके तयार करण्यात आली.
या तपास पथकांच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. तेव्हा शोध मोहीम राबविताना पोलिसांच्या वतीने आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले. तसेच आरोपीचे नातेवाईक आणि तो काम करत असलेली ठिकाणे यांची देखील माहिती काढण्यास सुरुवात केली. दि.०७/०५/२०२६ रोजी आरोपी हा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवनानगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पौड पोलिसांना मिळाली. तेव्हा मिळालेल्या माहितीच्या आधारे पौड पोलिसांनी लोणावळा ग्रामीण (पवनानगर चौकी) चे पो.हवा. नवनाथ चपटे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी गजानन पवार याला मोठ्या शितापीने पकडून ताब्यात घेत त्याला रीतसर अटक केली आहे.
महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील असून अशा गुन्ह्यांतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. डोंगराळ भागात शोध घेऊन आमच्या पथकाने या आरोपीला जेरबंद केले आहे. - संतोष गिरीगोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलीस स्टेशन