जेजुरी : पुरंदर तालुक्यातील खानवडी (ता. पुरंदर) येथील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाबद्दल सुरुवातीला पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेनंतर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व असंख्य मंत्री, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झाल्यामुळे ही शाळा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
या शाळेत बारावीपर्यंत मोफत व इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणार असल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. तथापि, निवड प्रक्रियेदरम्यान अनेक फेऱ्या पार करून अंतिम टप्प्यापर्यत पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अचानक प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालकांच्या मते, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्येशिक्षण घेतले, त्यांना मोठ्या प्रमाणावर डावलण्यात आले आहे, तर काही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. "गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमात 'गरिबी'ची व्याख्या नेमकी काय ठरवली?" असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. अपात्र विद्यार्थ्यांची कारणे जाहीर करण्याची मागणी
यासोबतच, प्रवेश प्रक्रियेतील निकष, निवड यादी आणि अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांची कारणे जाहीर करण्याची मागणीही जोर धरत आहे. पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत पालकांनी प्रशासनाकडे सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पुरंदर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी या प्रकरणाची माहिती घेत असून, "जर खरोखरच गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे," अशी भूमिका व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे, शाळा व्यवस्थापनाने प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या समितीने सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, लवकरच शाळेसमोर उपोषण किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची चौकशी करावी
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची चौकशी करावी आणि गरज पडल्यास फेरप्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी अंकिता कामथे आणि विशाल कामथे व इतर पालकांकडून करण्यात येत आहे.
आमची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही, आम्ही नातेवाइकांच्या घरात राहतो, स्वतःचे वाहन नाही, मोलमजुरी करतो, मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे, तरीही मुलाला येथे प्रवेश मिळत नसेल तर शाळेने प्रवेशासाठी गरिबाची केलेली व्याख्या आम्हाला समजावून सांगावी. - अंकिता कामथे, पालक खळद आमच्या घरी दोनदा आले, आमची परिस्थिती पाहिली आणि सांगितलं तुम्हाला फोन येईल, परंतु आम्हाला फोन आला नाही. आता शाळा सुरू झाली आहे. यावरून आम्हाला प्रवेश मिळाला नाही, हे समजते. परंतु येथे वशिलेबाजी झाल्याचे दिसते. येथे काही प्रवेश हे आमच्यापेक्षा सधन असणाऱ्या किंबहुना सरकारी नोकरी असणाऱ्यांच्या मुलांनाही दिले असल्याचे समजते, आमचा त्याला विरोध नाही; पण गरिबांसाठी आलेल्या योजना फक्त घोषणेपुरत्याच राहणार का? आमच्यासारख्या गरिबांना न्याय कथी मिळणार. - कोमल कामथे, पालक खळद
Web Summary : Admission irregularities at Jyoti Savitri School in Purandar raise concerns. Parents allege preference for non-Zilla Parishad students, demanding transparency and fair review. Officials are investigating the matter.
Web Summary : पुरंदर के ज्योति सावित्री स्कूल में प्रवेश अनियमितताओं से चिंताएँ बढ़ीं। अभिभावकों ने गैर-जिला परिषद छात्रों को प्राथमिकता देने का आरोप लगाया, पारदर्शिता और निष्पक्ष समीक्षा की मांग की। अधिकारी मामले की जांच कर रहे हैं।