ऊस गाळप हंगामाची अखेर, ९९ लाख टन साखर उत्पादन, अंदाजापेक्षा ७ लाख टनांची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:29 IST2026-04-17T09:28:45+5:302026-04-17T09:29:13+5:30

गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा १८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.

pune news sugarcane crushing season ends, sugar production at 9.9 million tonnes, 7 lakh tonnes less than expected | ऊस गाळप हंगामाची अखेर, ९९ लाख टन साखर उत्पादन, अंदाजापेक्षा ७ लाख टनांची घट

ऊस गाळप हंगामाची अखेर, ९९ लाख टन साखर उत्पादन, अंदाजापेक्षा ७ लाख टनांची घट

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपातून ९९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी ९.४९ टक्के साखरउतारा मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला १०६ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज असताना हंगामाच्या अखेरच्या काळात उसाला आलेले तुरे यामुळे उत्पादनात घट झाली. परिणामी साखरउतारा चांगला असतानाही प्रत्यक्ष साखर उत्पादन सात लाख टनांनी घटले आहे. मात्र, गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा १८ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.

यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ८९ लाख टन, तर कर्नाटकमध्ये ४७ लाख टन साखर उत्पादित झाली. राज्यात यंदा एक नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. त्यात १०३ सहकारी व १०७ खासगी अशा २१० कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली. साधारण पाच महिन्यांच्या काळात राज्यात १ हजार ४५ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध झाला. त्यातून ९.४९ टक्के उताऱ्यातून ९९ लाख १८ हजार टन साखर उत्पादित झाली. सर्वाधिक २३ लाख टन साखर कोल्हापूर विभागातून तर त्या खालोखाल पुणे विभागात २२ लाख टन तर सोलापूर विभागात १९ साखर उत्पादित केली आहे. अहिल्यानगर विभागात ११ लाख टन, संभाजीनगरमध्ये १० व नांदेड विभागात ११ लाख टन साखर उत्पादित केली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात ८९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात ९० लाख टन तर महाराष्ट्रात ८० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. यंदा उत्तर प्रदेशानंतर कर्नाटकात ४७ लाख टन साखर उत्पादित केली आहे.

राज्यात साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाची उपलब्धता बघता १०६ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला होता. मात्र, हंगामाच्या अखेरीस मराठवाड्यात उसाला आलेल्या तुऱ्यांमुळे उत्पादनात घट झाली. प्रत्यक्षात साखरउतारा चांगला मिळत असला तरी ऊस उत्पादन घटल्याने साखर उत्पादनही घटले. पुढील हंगामात अर्थात २०२६-२७ या आर्थिक वर्षात १ हजार लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर पडणार आहे. परिणामी सरासरी पर्जन्यमानात किमान सात ते आठ टक्के घट होऊ शकते. त्यामुळे पाऊसमान कसे राहते, यावरच पुढील साखर उत्पादन अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : महाराष्ट्र में चीनी उत्पादन अनुमान से कम, फिर भी देश में शीर्ष पर

Web Summary : महाराष्ट्र में गन्ना पेराई सत्र 99 लाख टन चीनी के साथ समाप्त हुआ, जो 106 लाख टन के अनुमान से कम है। 9.49% की अच्छी चीनी रिकवरी दर के बावजूद, गन्ने का उत्पादन कम हुआ। महाराष्ट्र राष्ट्रीय चीनी उत्पादन में सबसे आगे है, उत्तर प्रदेश और कर्नाटक से आगे।

Web Title : Maharashtra's Sugar Production Ends Lower Than Expected, Still Tops Nation

Web Summary : Maharashtra's sugarcane crushing season concludes with 99 lakh tonnes of sugar, less than the 106 lakh tonne estimate. Despite a good sugar recovery rate of 9.49%, sugarcane output declined. Maharashtra leads national sugar production, surpassing Uttar Pradesh and Karnataka.