वाचवा... वाचवा...! बहिणीचा आक्रोश अन् पाण्यात बुडून काही मिनिटांत संपलं २ चिमुकल्यांचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:58 IST2026-05-05T15:54:34+5:302026-05-05T15:58:06+5:30
- ही घटना लक्षात येताच बहिणीने आरडाओरडा केला. मात्र, तिला पोहता येत नसल्याने ती मदत करू शकली नाही.

वाचवा... वाचवा...! बहिणीचा आक्रोश अन् पाण्यात बुडून काही मिनिटांत संपलं २ चिमुकल्यांचं आयुष्य
ओतूर (पुणे जि.) : जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील वसईवाडी परिसरात मंगळवारी अत्यंत दुःखद घटना घडली. खेळता खेळता तळ्यात गेलेल्या जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अधिक माहितीनुसार, श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय ११) अशी मृत मुलांची नावे असून, उन्हाळी सुट्टीमुळे दोघेही घरी होते. मंगळवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोठ्या बहिणीसोबत गावाजवळील तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बहिण कपडे धुत असताना श्रावणी आणि गणेश खेळता खेळता पाण्यात उतरले. पोहण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले. ही घटना लक्षात येताच बहिणीने आरडाओरडा केला. मात्र, तिला पोहता येत नसल्याने ती मदत करू शकली नाही. त्या वेळी परिसरात कोणीही मोठी व्यक्ती नसल्याने तातडीची मदत मिळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तळ्याकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर प्रथम श्रावणीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही वेळाने गणेशलाही पाण्यातून बाहेर आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही मुलांना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
साबळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहेत.