सहकार विद्यापीठाबाबत होणार लवकरच निर्णय; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:45 IST2026-04-18T12:44:56+5:302026-04-18T12:45:51+5:30

राज्य सहकारी संघाचे काम प्रशिक्षणाचे असून यासाठी लागत असलेला शिक्षण निधी येत्या अधिवेशनात कायदा करून मिळवून देण्याचा प्रयत्न करू

pune news decision on Cooperative University to be taken soon; Information from Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | सहकार विद्यापीठाबाबत होणार लवकरच निर्णय; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

सहकार विद्यापीठाबाबत होणार लवकरच निर्णय; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : “राज्यातील विद्यापीठांमधून अजूनही सहकार विषय शिकविला जात नाही. मात्र, येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सहकार विभागाची स्थापना करण्यात येईल. तसेच स्वतंत्र सहकार विद्यापीठाबाबतही निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्य सहकारी संघाच्या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील कांबळे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, संजीव कुसाळकर, शिवाजी नलावडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “राज्य सहकारी संघाचे काम प्रशिक्षणाचे असून यासाठी लागत असलेला शिक्षण निधी येत्या अधिवेशनात कायदा करून मिळवून देण्याचा प्रयत्न करू. संघाने स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून तो राज्य सरकारकडून मान्य करून घ्यावा.” दरेकर म्हणाले, “राज्यातील सहकारी संस्थांकडून मिळणारा शिक्षण निधी बंद झाला आहे. तो सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करावा. राज्य सरकारकडून किमान पाच कोटी रुपये मिळाले तर राज्यातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून संघ नावारूपाला येईल.”

अनास्कर म्हणाले, “राज्य सहकारी संघाने सहकाराच्या धोरणांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारला अपेक्षित काम करावे. सहकार संस्कृती तळागाळात रुजण्यासाठी संघाने काम करावे. त्यात मूल्यांचे शिक्षण आणि नैतिकतेचे धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.” राज्यात १२ हजार संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या संस्थांचे लेखापरीक्षणही आता ऑनलाइन होत असल्याची माहिती तावरे यांनी दिली. 

विरोधकांना आकडे माहीत नाहीत

राज्यावर कर्जाचा मोठा भार असल्याची टीका विरोधकांकडून होत असते. मात्र, कर्ज फेडणाऱ्यालाच दुसरे कर्ज मिळत असते, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारने एकल उत्पादनाआधारे २५ कर्ज घेण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे. राज्याने आतापर्यंत केवळ अठरा टक्केच कर्ज उचलले आहे. हे आकडे विरोधकांना दिसत नाहीत, अशी टीका देखील पाटील यांनी यावेळी केली.

सहकारातील समस्यांबाबत ऐकणारा नेता म्हणजे चंद्रकांत पाटील अशी आमची धारणा आहे. त्यानुसारच आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलाविले, असे प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. हाच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांच्या नावासमोरील कॅबिनेट मंत्री दर्जा यातील दर्जा हा शब्द जाऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. सध्या ते सहकारात चांगले काम करत असून त्यांना सहकारमंत्रिपद मिळाल्यास आनंद होईल, असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर दरेकर यांनी पाटील यांची सदिच्छा जरी असली तरी असे होणार नाही, असे स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलताना दिले.

Web Title : सहकार विश्वविद्यालय पर जल्द निर्णय: मंत्री चंद्रकांत पाटिल की जानकारी

Web Summary : मंत्री चंद्रकांत पाटिल ने कहा कि राज्य के सभी विश्वविद्यालयों में जल्द ही सहकारिता विभाग स्थापित किया जाएगा। स्वतंत्र सहकार विश्वविद्यालय पर भी निर्णय होगा। उन्होंने राज्य के कर्ज पर विपक्ष की आलोचना का जवाब दिया और प्रवीण दरेकर के काम की सराहना की।

Web Title : Cooperative University decision soon: Minister Chandrakant Patil informs.

Web Summary : A cooperative department will be established in all state universities within months. A decision regarding an independent Cooperative University will also be made, said Minister Patil. He also addressed state debt concerns and praised Praveen Darekar's work in the cooperative sector.