Crime News: पुण्यातील बँकेत व्यवस्थापकाला धमकी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:27 IST2026-04-15T12:22:19+5:302026-04-15T12:27:14+5:30
- शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

Crime News: पुण्यातील बँकेत व्यवस्थापकाला धमकी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : बँकेत येऊन व्यवस्थापकाला शिवीगाळ व मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी राजू वाघरेशा (५८, दोघे रा. गोमराज व्हिला, गुलटेकडी), राहुल राजू वाघरेशा (२८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (३९, रा. राॅयल एनरिच सोसायटी, हडपसर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेतील कल्पतरू प्लाझा येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी सोमवारी (दि. १३) दुपारी दीडच्या सुमारास बँकेत आले. बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हे बँक व्यवस्थापक सिंग यांच्या दालनात शिरून त्यांना मारण्याच्या प्रयत्नात होते. सिंग यांनी या घटनेची माहिती बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना दिली.
आरोपींनी सुुरक्षारक्षक जगताप यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दाढे करत आहेत.