राजकारणी, धनदांडगे लाेक जमिनी बळकावत सुटले; यातूनच मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:50 IST2026-04-30T14:49:56+5:302026-04-30T14:50:24+5:30
महाराष्ट्रात एकेकाळी ‘कसेल त्याची जमीन’ अशी चळवळ उभी केली गेली. आता मात्र दिसेल त्याची जमीन हाेत आहे

राजकारणी, धनदांडगे लाेक जमिनी बळकावत सुटले; यातूनच मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न - राज ठाकरे
पुणे: महाराष्ट्रात एकेकाळी ‘कसेल त्याची जमीन’ अशी चळवळ उभी केली गेली. आता मात्र दिसेल त्याची जमीन हाेत आहे. कारण, राजकारणी, धनदांडगे लाेक जमिनी बळकावत सुटले आहेत. आहे ते सर्व ओरबाडून घेतले जात आहे. यातूनच मराठी शाळा बंद करून मध्यवर्ती जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा मराठी शाळांच्या जागेवर कुणाचा डोळा आहे ते बाहेर काढावे असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
पत्रकार वरुणराज भिडे परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात बुधवारी (दि. २९) सायंकाळी हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे होते. याप्रसंगी मंचावर माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, कमलेश सुतार, दीपक कांबळे आणि मीनाक्षी गुरव यांना यंदाचा वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक अंकुश काकडे यांनी केले. माजी आमदार उल्हास पवार यांनी पुरस्काराची माहिती दिली. सन्मानार्थी पत्रकारांनीही मनाेगत व्यक्त केले.
ठाकरे म्हणाले की, पत्रकारिता बदलली हे खरंच आहे; पण सरकार पत्रकारांना किंमत देत नाही, हे भयावह आहे. ‘आम्ही पत्रकारांना शरण आणू शकतो,’ असे राजकारण्यांना वाटत राहणे, हे त्याहून भयानक आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी वास्तवावर बाेट ठेवले. पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज; पण ते एकत्र राहू नयेत ही सत्तेची गरज आहे. संपादक संजय आवटे यांनी आपल्या भाषणातून आशावाद दाखवला. मीदेखील आशावादी आहे. पत्रकारांना खरंतर क्रांती करायची आहे; पण राजकीय दबावांमुळे ती करता येत नाही. हे वास्तव चिंताजनक आहे. चांगले चांगले पत्रकार पत्रकारिता साेडून मंत्र्यांकडे पीए म्हणून काम करताना दिसत आहेत. उघडपणे दबाव टाकण्याचा प्रकार थांबवायचा असेल तर पत्रकारांनी दबाव टाकणाऱ्यांच्या बातम्या देणे थांबवले पाहिजे. पत्रकारांनी त्यांची दहशत निर्माण केली पाहिजे, मगच ताकद कळेल. सत्तेचा कधी अमरपट्टा नसतो, त्यामुळे परिस्थिती बदलेल. पत्रकारिता संपणार नाही; पण पत्रकारांनी एकमेकांबद्दलची असूया साेडावी, एखादा विषय महत्त्वाचा असेल तर सर्वांनी लावून धरावा, असा सल्लाही दिला.