घराबाहेर सोडणे तर दूरच, शाळेत पाठवतानाही भीती वाटते; नसरापूर घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:24 IST2026-05-05T12:23:58+5:302026-05-05T12:24:35+5:30
नसरापूर घटनेमुळे पालकांची मानसिकता अधिक सावध आणि संशयी बनत चालली आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याबाबत पालक अधिक जागरूक झाले आहेत.

घराबाहेर सोडणे तर दूरच, शाळेत पाठवतानाही भीती वाटते; नसरापूर घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता
पुणे: नसरापूर येथे शुक्रवारी घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे हादरले आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय आरोपीने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, विशेषतः पालकांमध्ये या घटेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
आता मुलींना घराबाहेर सोडणे तर दूरच, शाळेत पाठवतानाही भीती वाटते, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. शाळा, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पालकांची मानसिकता अधिक सावध आणि संशयी बनत चालली आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याबाबत पालक अधिक जागरूक झाले आहेत.
समुपदेशकांचे मत काय?
समुपदेशकांच्या मते, अशा घटनांमुळे पालक आणि मुलांवर मानसिक ताण निर्माण होतो. भीतीचे वातावरण दीर्घकाळ टिकल्यास मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवून त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे ‘गुड टच-बॅड टच’सारख्या संकल्पनांची माहिती देणे, अनोळखी व्यक्तींविषयी सावधगिरी बाळगण्याचे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे समुपदेशक करूणा मोरे यांनी सांगितले.
अशा घटनेनंतर भीती ही नैसर्गिक प्रतिक्रिया असली, तरी ती अतिरेक होऊ नये. मुलांना घाबरवण्याऐवजी त्यांना योग्य-अयोग्य स्पर्श, सुरक्षित वर्तन याबाबत शिक्षित करणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी स्वतःही मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. - उल्हास लुकतुके, मानसोपचार तज्ज्ञ
लहान मुलांवर इंटरनेट, मोबाईलचा विपरित परिणाम
सध्या अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुले आरोपी असतात. याचे प्रमाण अलिकडच्या अनेक घटनांमध्ये दिसून येत आहे. याला कुठेना कुठे लहान वयातच मुलांना सहज उपलब्ध होणारे प्रसारमाध्यम आहे. अश्लील व हिंसक गोष्टींचा वाढता प्रसार हा आजच्या डिजिटल युगातील गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलांना अशा प्रकारच्या सामग्रीचा अनियंत्रित संपर्क येऊ लागला आहे. या सामग्रीमुळे वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा धूसर होतात, तसेच संवेदनशीलतेची पातळी कमी होत जाते. वारंवार अशा दृश्यांचा अनुभव घेतल्याने काही व्यक्तींमध्ये आक्रमकता, असंवेदनशीलता आणि विकृत विचारसरणी विकसित होण्याची शक्यता वाढते. विशेषतः योग्य मार्गदर्शन आणि संवादाचा अभाव असल्यास मुलांवर त्याचा अधिक परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, योग्य वयात योग्य माहिती देणे अत्यंत आवश्यक ठरते.