मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; एक कोटींचे साहित्य जळून खाक, शिरूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:24 IST2026-05-19T17:23:40+5:302026-05-19T17:24:56+5:30
गोडाऊनच्या शेजारीच निवासी घरे असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, वेळेत पावले उचलल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही

मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; एक कोटींचे साहित्य जळून खाक, शिरूर तालुक्यातील घटना
शिक्रापूर :पाबळ ता. शिरूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्र झोडगे यांच्या मंडप डेकोरेशनच्या मोठ्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील मंडप साहित्य, खुर्च्या ,आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुमारे एक कोटी ८६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाने तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग एवढी भीषण होती की, काहीच वेळात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट आकाशात पसरले. गोडाऊनच्या शेजारीच निवासी घरे असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, वेळेत पावले उचलल्यामुळे शेजारील घरांना आगीची झळ बसली नाही आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळल्यानंतर खेड व पिंपरी चिंचवड भागातील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दीड तें दोन तासांनी घटनास्थळी दाखल झाल्या. त्या अगोदर स्थानिक नागरिकांनी टँकरच्या मध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्ररूप पाहता पाण्याचे टँकर कमी पडू नये म्हणून स्थानिक टँकरचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. अग्निशामक जवान आणि स्थानिक नागरिकांनी जिवाची बाजी लावत तब्बल चार तास अथक प्रयत्न केले, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत राजेंद्र झोडगे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोडाऊनमध्ये लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारे महागडे साहित्य साठवून ठेवण्यात आले होते, जे पूर्णपणे जळाले आहे. घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी राहुल गवते ,म्हातारंबा चव्हाण घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.