आरोपींना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली; शरद मोहोळ खून प्रकरणात वकिलाचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:28 IST2026-04-14T18:26:01+5:302026-04-14T18:28:26+5:30

वकिलाने गोळीबार करणाऱ्या आरोपींना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली, तसेच सहआरोपी वकीलाशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली

Helped the accused escape in his car; Lawyer's bail rejected in Sharad Mohol murder case | आरोपींना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली; शरद मोहोळ खून प्रकरणात वकिलाचा जामीन फेटाळला

आरोपींना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली; शरद मोहोळ खून प्रकरणात वकिलाचा जामीन फेटाळला

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपीचा गुन्ह्यातील कटकारस्थानातील सहभाग तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळत असल्याचे न्यायालयाने नमूद करीत आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत तसेच मूळ फिर्यादी याचे वकील खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.

घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कांगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तेथून त्यांनी गोळीबार करणारा साहिल पोळेकर, नामदेव कांगुडे आणि चंद्रकांत शेलके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली. उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली. तसेच सहआरोपींना सीमकार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला आणि खेड - शिवापूर टोलनाक्याजवळ नवीन सीमकार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाबाबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद जामीनाला विरोध करताना ॲड. राजपूत आणि सोलंकी यांनी केला.

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, संजय उधाण हे व्यवसायाने वकील असून, आरोपी त्यांचे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क हा केवळ व्यावसायिक स्वरुपाचा होता. तसेच, सहआरोपी रवी पवार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समानतेच्या तत्त्वावर त्यांनाही जामीन द्यावा. दरम्यान, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावताना नमूद केले की, रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती आणि त्यांचा थेट शूटरांशी संपर्क नव्हता. उलट संजय उधाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, हालचालींचे समन्वय करणे आणि आत्मसमर्पणाबाबत प्रयत्न करणे यावरून त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. न्यायालयाने कायदेशीर सल्ला या बचावालाही नाकारले. 

Web Title : शरद मोहोल हत्याकांड: आरोपियों को भगाने में मदद करने वाले वकील की जमानत खारिज।

Web Summary : शरद मोहोल हत्याकांड में वकील की जमानत खारिज कर दी गई। वकील पर हत्यारों को भागने में मदद करने, गतिविधियों का समन्वय करने और सबूत नष्ट करने की सलाह देने का आरोप है, जिससे अपराध में सक्रिय भागीदारी का पता चलता है।

Web Title : Lawyer's bail rejected for aiding Sharad Mohol murder accused escape.

Web Summary : A lawyer's bail was denied in the Sharad Mohol murder case. He allegedly helped the shooters escape, coordinated movements, and advised destroying evidence, demonstrating active involvement in the crime.