दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश; पुण्यात घरफोडीच्या ४ प्रकरणांमध्ये ६ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:36 IST2026-04-27T12:35:52+5:302026-04-27T12:36:20+5:30
घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत दागिने, पैसे लंपास केले

दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश; पुण्यात घरफोडीच्या ४ प्रकरणांमध्ये ६ लाखांचा ऐवज लंपास
पुणे : घरफोडीच्या वेगवेगळ्या चार प्रकरणांमध्ये चोरांनी ५ लाख ९४ हजार ४७९ रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धायरी येथील ३८ वर्षीय तक्रारदाराने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरांनी १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचेदागिने लांबवले. हा प्रकार शनिवारी (दि. २५) घडला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
दुसऱ्या घटनेत उरूळी देवाची येथील ५२ वर्षीय तक्रारदाराने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २५) सकाळी १० ते संध्याकाळी सव्वापाच या वेळेत ते घरात नसल्याची संधी साधत चोरांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील तिजोरी उचकटून २ लाख ४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचेदागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, लोहगाव येथील ३१ वर्षीय तरुणाने लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. २३) रात्री ११ ते शुक्रवारी (दि. २४) दुपारी तीनच्या दरम्यान चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले ५४ हजार ४७९ रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.
चौथ्या घटनेत, वडगावशेरी येथील ४० वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवार ते शनिवार दरम्यान चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लामखडे करत आहेत.