Crime News : थेऊरमध्ये चिमुकलीला एकट पाहून अत्याचाराचा प्रयत्न;आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:02 IST2026-05-06T20:02:19+5:302026-05-06T20:02:55+5:30
Crime News : या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Crime News : थेऊरमध्ये चिमुकलीला एकट पाहून अत्याचाराचा प्रयत्न;आरोपी अटकेत
उरुळी कांचन (पुणे जि. ) : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. थेऊर परिसरात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. ५) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिकच्या माहितीनुसार, पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे राहण्यासाठी आली होती. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केला आणि मुलीची सुटका केली.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नसरापूर आणि पर्वती येथील ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.