पुणे : यंदा अकरावी ऑनलाइन नोंदणी वेगाने सुरू झाली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वर्ग वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. यानुसार अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. राज्य बाेर्डाने शुक्रवारी (दि. ८) दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वरील माहिती दिली.
राज्याची अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दरवर्षीच रेंगाळत असून, या प्रक्रियेत १० प्रवेश फेऱ्यांपेक्षा अधिक होतात. त्याचप्रमाणे दिवाळीनंतरही प्रवेश प्रक्रिया सुरू राहत असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता आयुक्त सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली.
आयुक्त सिंह म्हणाले की, दरवर्षी सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकर पूर्ण होतात. मात्र, काही विद्यार्थ्यांना पहिल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्याने संपूर्ण प्रक्रिया रेंगाळते. ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अतिरिक्त प्रवेश फेऱ्या राबवाव्या लागतात. परिणामी प्रवेश प्रक्रियेला उशीर होतो.
यंदा दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधी जाहीर झाला आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियादेखील लवकर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ग वेळेत सुरू करण्यावर भर दिला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेशही पुढील फेऱ्यांद्वारे तातडीने पूर्ण केले जातील, असेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी, प्राधान्यक्रम निवड व कागदपत्रे अपलोड ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाकडून केले आहे.
अकरावीसाठी तब्बल ७ लाख ७७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
आगामी शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in/landing या वेबसाइटवरून नाव नोंदणी करायची आहे. यावर आतापर्यंत ७ लाख ७७ हजार २३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत भाग-१ भरला आहे. तसेच ९ हजार ५९४ ज्युनिअर कॉलेजांची नोंदणी झाली आहे. विद्यार्थ्यांना भाग-२ म्हणजेच प्रवेशासाठी कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठीची प्रक्रिया लवकर सुरू होईल. विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Web Summary : Eleventh grade classes will begin July 1st. Online registration is proceeding swiftly to avoid delays. 7.77 lakh students registered via mahafyjcadmissions.in. Prioritize timely completion of all steps, urges the education department.
Web Summary : 11वीं कक्षाएं 1 जुलाई से शुरू होंगी। ऑनलाइन पंजीकरण में तेजी आई है ताकि देरी से बचा जा सके। 7.77 लाख छात्रों ने mahafyjcadmissions.in के माध्यम से पंजीकरण किया। शिक्षा विभाग ने सभी चरणों को समय पर पूरा करने का आग्रह किया है।